👉पत्राची प्रत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विधान परिषदेचे सचिव राजेंद्र भागवत यांनाही पाठवली
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
गुवाहाटी – महाराष्ट्र राज्यात सुरू असलेल्या राजकीय घडामोडीकडे देशासह राज्याचे लक्ष लागले आहे. शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी स्वतःस विधिमंडळ पक्षनेते म्हणून घोषित केले आहे. तसे त्यांनी पञ ही उपसभापती नरहरी झिरवाल यांना पाठवले आहे. यात त्यांच्या समर्थनार्थ ३७ आमदारांच्या सह्या आहेत. शिंदे यांनी या पत्राची प्रत राज्यपाल भगतसिंग कोश्यारी आणि विधान परिषदेचे सचिव राजेंद्र भागवत यांनाही पाठवली आहे.
आपल्यासोबत ४९ आमदार असल्याचा दावा शिंदे करत आहेत. रात्री उशिरा आणखी काही आमदारही गुवाहाटीमध्ये पोहोचले आहेत. एकूणच शिंदे यांची शिवसेना मजबूत होत आहे. बहुधा शिंदे आज (शुक्रवार) भाजपसोबतच्या युतीबाबत काही मोठी घोषणा करण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
शिवसेनेतील बंडाळीला भाजपचा पाठिंबा असल्याचा आता स्पष्ट झाले आहे. खुद्द एकनाथ शिंदे यांनीच बंडखोर आमदारांपुढे बोलताना हे स्पष्ट केले आहे. ‘आपल्या बंडाला एका महाशक्तीचा, राष्ट्रीय पक्षाचा पाठिंबा असून, त्याची प्रचिती वेळोवेळी येईल,’ असे ते म्हणालेत. त्यांनी यावेळी भाजपचे नाव घेतले नाही. पण, त्यानंतर काही वेळातच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी हा पक्ष कोणता हे वेगळे सांगण्याची गरज नसल्याचे स्पष्ट करत या बंडामागे भाजपच असल्याचा दावा केला.