संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई- महाराष्ट्र राज्य विधीमंडळ हिवाळी अधिवेशन हे दि.22 डिसेंबरला मुंबईत होणार आहे. यावर कामकाज समितीने शिक्कामोर्तब केला आहे. यंदाच्या हिवाळी अधिवेशाची तारीख संसदीय कामकाजमंत्री अनिल परब यांनी जाहीर केली आहे. अधिवेशनाचा कालावधी किती असणार हे मात्र अजूनही स्पष्ट करणात आलेले नाही. 24 डिसेंबरला अधिवेशनाचा कालावधी ठरवण्यात येईल अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे. यंदाचे हिवाळी अधिवेशन नागपुरमध्ये नसून मुंबईतच होईल अशी माहिती अनिल परब यांनी दिली आहे.
22 डिसेंबरपासून हिवाळी अधिवेशन होणार आहे. 22, 23, 24 असा कार्यक्रम नक्की झाला आहे, दुसऱ्या आठवड्यात 27 आणि 28 डिसेंबर असा कार्यक्रम ठरला आहे, अशी माहिती संसदीय कामकाज मंत्री अनिल परब यांनी दिली आहे. यंदाचं हिवाळी अधिवेशन किती दिवसांचे असेल हे मात्र अजूनही अस्पष्ट आहे. या अधिवेशनात 12 बिले, 11 विधेयके मांडली जाण्याची शक्यता आहे. अधिवेशनात प्रश्नोत्तरे देखील घेतली जातील, अशी माहिती परबांनी दिली. अधिवेशन वाढवण्याचा निर्णय 24 डिसेंबरला होईल. असेही ते म्हणाले.
नागपुर कराराअंतर्गत वर्षातून एकदा अधिवेशन नागपुरात घेणे बंधनकारक आहे. मात्र मागच्या वर्षीप्रमाणे याही वर्षी हिवाळी अधिवेशन नागपुर ऐवजी मुंबईत होणार आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर करण्यात आलेल्या शस्त्रक्रियेनंतर हिवाळी अधिवेशन मुंबईत घेण्याची मागणी महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली होती. त्यानंतर अखेर कामकाज समितीने शिक्कामोर्तब केला आहे.
अधिवेशनात फक्त यांनाच प्रवेश नव्या कोरोना व्हेरिएंटवर आजच्या बैठकीत चर्चा करण्यात आली. अधिवेशनात ज्यांनी कोरोना लसीचे दोन डोस झाले असतील, त्यांनाच यंदाच्या हिवाळी अधिवेशनात प्रवेश मिळणार आहे. त्यामुळे अधिवेशनात किती सदस्य उपस्थित असतील हेही सांगता येत नाही. अधिवेशनात हजेरी लावण्यासाठी आरटीपीसीआर टेस्टदेखील बंधनकारक असणार असल्याचे परब यांनी सांगितले.
मागील हिवाळी अधिवेशन दोनच दिवसात उरकले
गेल्या वर्षी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हिवाळी अधिवेशन नागपुर ऐवजी मुंबईत घेण्यात आले होते. विशेष म्हणजे अधिवेशनाचा कालावधी अत्यल्प असून, दोनच दिवसात हे अधिवेशन आटोपण्यात आले होते. त्यामुळे यंदाचे तरी अधिवेशन नागपुरात व्हावे. अशी मागणी भाजपच्या काही नेत्यांनी लावून धरली होती. मात्र यंदाचे हिवाळी अधिवेशन देखील मुंबईत होणार आहे.