‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस वे’ च्या माध्यमातून अहमदनगर च्या विकासाला चालना- नितीन गडकरी

👉तीन महत्त्वपूर्ण रस्ते कामांची घोषणा
👉अहमदनगर जिल्ह्यातील ५२७ किलोमीटर च्या  ४०७५ कोटी रूपयांच्या कामांचे भूमिपूजन व लोकार्पण.

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – 
येत्या काळात महाराष्ट्रात रस्त्यांचे जाळे निर्माण करण्यात येईल. या माध्यमातून महाराष्ट्र विकासाच्या बाबतीत देशात पहिल्या नंबरवर आणण्याचा प्रयत्न राहिल, तसेच ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ च्या माध्यमातून अहमदनगर जिल्ह्यातील विकासाला गती मिळणार आहे. रोजगार वाढणार आहे.” असे प्रतिपादन केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी आज येथे केले. यावेळी श्री. गडकरी यांनी अहमदनगर च्या विकासाच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण असलेल्या तीन रस्त्यांच्या कामांची घोषणाही केली.
अहमदनगर येथे आज  ४०७५ कोटी किंमतीच्या ५२७ किलोमीटर  लांबीच्या २५ महामार्ग प्रकल्पाचे भूमिपूजन व लोकार्पण श्री.नितिन गडकरी यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी राज्यसभा सदस्य  शरद पवार, ग्रामविकास-कामगार मंत्री तथा पालकमंत्री हसन मुश्रीफ, मदत व पुनर्वसन राज्यमंत्री प्राजक्त तनपुरे, खासदार सदाशिवराव लोखंडे, सुजय विखे पाटील, महापौर श्रीमती रोहिणी शेडगे, जिल्हा परिषद अध्यक्षा राजश्री घुले पाटील, आमदार अरुणकाका जगताप, बबनराव पाचपुते, श्रीमती मोनिका राजळे, संग्राम जगताप,  रोहित पवार,  निलेश लंके आदी उपस्थित होते.
श्री.गडकरी म्हणाले, सुरत-नाशिक-नगर-सोलापूरमार्ग चेन्नईला जाणाऱ्या नवीन ‘ग्रीन फिल्ड एक्स्प्रेस-वे’ ची अहमदनगर जिल्ह्यातील लांबी १८० किलोमीटर आहे‌. यात महाराष्ट्रात ५० हजार कोटी खर्च केले जाणार आहेत. यातील अहमदनगर जिल्ह्यातच ८ हजार कोटी खर्च होणार आहेत. त्यामुळे नगर जिल्ह्यात जेथे शक्य असेल तेथे लॉजिस्टिक पार्क, इंडस्ट्रियल क्लस्टर व ट्रांसपोर्ट नगर उभारणे शक्य आहे. त्यामूळे नगर जिल्ह्याच्या विकासाला चालना मिळेल. येथील तरूणांच्या हाताला काम मिळेल. एक्सीस कंट्रोलने हा महामार्ग बांधत आहोत.  सुरतपासून नाशिक, अहमदनगर, सोलापूर, अक्कलकोट, गुलबर्गा, यादगीर, कर्नुल आणि चेन्नई (दिल्ली-मद्रास) असा  १२७० किलोमीटरचा महामार्ग असेल. सध्या याची लांबी १६०० किलोमीटर आहे. म्हणजेच या रस्त्याची महाराष्ट्रातून जाणारी ३३० किलोमीटर लांबी कमी होणार आहे. मुंबई पुण्यासह ठाणे, कोल्हापूर, सोलापूरची देखील सर्व वाहतूक कमी होईल आणि प्रदूषणही कमी होईल. हा प्रकल्प महाराष्ट्रासाठी पर्यायाने अहमदनगर साठी महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वास श्री.गडकरी यांनी व्यक्त केला.
    अहमदनगर साठी महत्वपूर्ण ठरतील असे तळेगांव – पाटोदा (रा.म.५४८) जामखेड-सौताळा (बीड-१३५ कोटी) व कोपरगांव – सावळी विहीर-(१५० कोटी) या रस्ते कामांची घोषणा करत नितीन गडकरी म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिर्डी विमानतळ परिसराच्या बाजूला नवीन स्मार्ट सिटी वसविण्याचा घेतलेला निर्णय स्तुत्य आहे. अशी नवीन शहरे वसविल्यास स्थानिक परिसराच्या विकासाला व रोजगाराला चालना मिळते. कोणत्याही देश व राज्याचा विकास पाणी, ऊर्जा, दळणवळण व संदेशवहन या चार गोष्टींवर अवलंबून असतो. या गोष्टी असल्यावर उद्योगांचे जाळे तयार होते. पर्यायाने रोजगार वाढतो.
शेतकऱ्यांनी काळाची पावले ओळखून आपल्या शेतीमध्ये आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला पाहिजे. साखर कारखानादारांनी आता अधिक साखर उत्पादन न घेता इथेनॉलचा उत्पादनाकडे वळले पाहिजे. पेट्रोलमध्ये २० टक्के इथेनॉलचा वापर केल्याने मोठ्या प्रमाणात प्रदुषणापासून मुक्तता मिळणार आहे.असेही गडकरी यांनी सांगितले.
ते पुढे म्हणाले, अहमदनगर उड्डाणपुलाच्या जमीन अधिग्रहणासाठी दोनशे कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून दिला आहे. तेव्हा प्रशासनाने लवकरात लवकर या उड्डाणपुलाचे काम मार्गी लावावे. विकासाच्या बाबतीत राजकारण करायचे नाही. याकडे माझा पहिल्यापासून कटाक्ष राहिला आहे. महाराष्ट्रात साडेतीन लाख कोटीं चे रस्ते कामे केले. एक लाख कोटींचे सिंचन कामे केली. ४० ‌हजार कोटी सिंचनाच्या अपूर्ण प्रकल्प पूर्ण करण्यासाठी दिले. असेही श्री.गडकरी यांनी सांगितले.
श्री.पवार म्हणाले, गडकरींच्या केंद्रीय मंत्रिपदापूर्वी ५ हजार किलोमीटर रस्ते कामे झाली होती. ते आल्यानंतर त्यांच्या मंत्रालयाच्या माध्यमातून १२ हजार किलोमीटर रस्त्यांची कामे झाली आहेत. लोकप्रतिनिधी कशाप्रकारे देशाच्या उभारणीसाठी काम करू शकतात त्याचे उत्तम उदाहरण गडकरी आहेत. अहमदनगर जिल्हा शेतीमध्ये संपन्न आहे. येथील  शेतकऱ्यांनी नव तंत्रज्ञानचा वापर करत शेतीपूरक उद्योगाकडे वळले पाहिजे. साखर कारखानदारांनी इथेनॉलच्या निर्मितीवर भर देणे गरजेचे आहे.
श्री.मुश्रीफ म्हणाले, शहरातील ‘उड्डाणपूल टप्पा क्रमांक दोन’च्या कामात केंद्राने मदत करावी. पुणे-औरंगाबाद मार्गाची वाहतूक जलद गतीने व्हावी, शिर्डी बाह्यवळण रस्ता, सावळी विहीर- कोपरगांव या रस्त्यांच्या कामात श्री.गडकरी अहमदनगर जिल्ह्याला मदत करतील. अशी अपेक्षा ही  मुश्रीफ यांनी यावेळी व्यक्त केली.
खासदार सदाशिव लोखंडे, सुजय विखे पाटील यांनी ही आपले विचार व्यक्त केले.
रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्रालय, भारतीय राष्ट्रीय राजमार्ग प्राधीकरण व महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक बांधकाम विभाग यांच्या माध्यमातून या प्रकल्पांचे कामकाज करण्यात येणार आहे. यावेळी अहमदनगर-फलटण, अहमदनगर-जामखेड, कोपरगांव-औरंगाबाद, नांदूर ते कोल्हार आणि झगडे फाटा- कोपरगांव या राष्ट्रीय महामार्गावरील २१० किलोमीटर पर्यंत रस्त्यांच्या कामांचे लोकार्पण करण्यात आले. राष्ट्रीय महामार्ग क्रमांक १६०, ५१६/अ, ६१ व ५४८/डी यांचे भारतमाला योजनेंतर्गत दुपदरीकरण व चौपदरीकरणांच्या कामांचे तसेच केंद्रीय राखीव निधी मधून अहमदनगर जिल्ह्यात १४ अंतर्गत रस्त्यांचे दुरूस्तीकरणांच्या कामांचे भूमिपूजन यावेळी श्री.गडकरी यांच्या हस्ते करण्यात आले. यात ४०७५ कोटी रूपयांच्या निधीतून ५२७ किलोमीटरच्या रस्त्यांची कामे करण्यात येणार आहेत.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!