सामान्यांच्या हक्कासाठी लढणाऱ्या काँग्रेसला घराघरात पोहोचविण्याच्या ना.थोरातांनी केल्या सूचना

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क

मुंबई : सर्वसामान्य जनतेच्या हक्कासाठी काँग्रेस सातत्याने लढत आली आहे. नगर शहरातील जनतेच्या मनामनात आणि घराघरात काँग्रेस पोहोचविण्याचे काम करण्याच्या सूचना महसूल मंत्री ना. बाळासाहेब थोरात यांनी शहरातील पदाधिकाऱ्यांना केल्या आहेत. शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष किरण काळे यांना नुकतेच जिल्हाध्यक्ष पदाचा पदभार स्वीकारून एक वर्ष पूर्ण झाले. यानिमित्त ना. थोरात यांनी काळे यांचे मुंबईत भरभरून कौतुक केले. 
मागील एक वर्षाच्या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाने शहरात कात टाकली असून काळे यांच्या एक वर्षाच्या अल्पशा कारकीर्दीमध्ये घेण्यात आलेले विविध कार्यक्रम, आंदोलने, मोर्चे, ठिय्या, धरणे, अभियाने, बैठका आदींचा कार्य अहवाल मुंबईत मंत्रालय येथे भेट घेत किरण काळे यांनी ना.थोरात यांना सुपूर्द केला. अवघ्या एक वर्षात अहोरात्र मेहनत घेत काँग्रेस पक्षाला गतवैभव मिळवून देण्याच्या दृष्टीने काळे यांनी केलेल्या कामाचे यावेळी ना.थोरात यांनी भरभरून कौतुक करत काळे यांच्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आहे. 

मंत्रालय येथे ना. थोरात यांची काळे यांनी भेट घेतली त्यावेळी शहर जिल्हा उपाध्यक्ष खलील सय्यद, शहर जिल्हा उपाध्यक्ष अनंतराव गारदे, विद्यार्थी काँग्रेसचे प्रभारी अनिस चुडीवाला, क्रीडा काँग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष प्रवीणभैय्या गीते पाटील आदी उपस्थित होते. 
मागील वर्षी १४ ऑगस्ट रोजी ना. थोरात यांनी काळे यांच्यावर शहर जिल्हाध्यक्ष पदाची धुरा सोपविली होती. यावेळी त्यांनी काळे यांना नगर शहरातून विधानसभेची देखील तयारी करावी लागेल, अशी जाहीर घोषणा केली होती. मध्यंतरी काँग्रेस कमिटी कार्यालयात झालेल्या कार्यकर्त्यांच्या बैठकीत देखील थोरात यांनी काळे यांना भवितव्य उज्वल असून वेळ प्रसंगी नगर शहराचा आमदार देखील काँग्रेस पक्षाचा होऊ शकतो असे वक्तव्य करत काळे यांना बळ दिले होते. 
काळे यांच्या कारकिर्दीला नुकताच एक वर्षांचा कालावधी पूर्ण झाला आहे. त्यांच्या कारकिर्दीमध्ये जनसामान्यांच्या विविध प्रश्नांवर काँग्रेस पक्षाने सातत्याने आवाज उठवण्याचे काम केले आहे. अहमदनगर महानगरपालिकेमध्ये सर्व पक्ष एकत्र आल्याचे चित्र असताना काळे यांनी मात्र काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून सर्वसामान्यांच्या प्रश्नावर संघर्ष उभा करत विरोधी पक्ष म्हणून सक्षम भूमिका काँग्रेस शहरात वठवित असल्याचे चित्र यशस्वीरित्या निर्माण केले आहे. 
वर्षपूर्ती बद्दल बोलताना किरण काळे म्हणाले की, एवढ्या कमी वयामध्ये काँग्रेस सारख्या राष्ट्रीय पक्षामध्ये माझ्यावर एवढी मोठी जबाबदारी ना. बाळासाहेब थोरात यांनी विश्वास टाकत सोपविली. हे मी माझे भाग्य समजतो. ना थोरात यांच्यासह आ.डॉ.सुधीर तांबे, सत्यजीत तांबे यांनी मला सातत्याने बळ देण्याचे काम केले. नगर शहरामध्ये काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून काम करत असताना पक्ष कुणाच्या दावणीला न जाऊ देता सर्वसामान्यांच्या हक्कांसाठी निर्भीडपणे संघर्ष करत शहराला विकासाच्या वाटेवर नेण्यासाठी माझा आणि काँग्रेस पक्षाचा सातत्याने प्रयत्न राहणार आहे. 
वर्षभरात दररोज काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून जनहिताच्या दृष्टीने काही ना काहीतरी उपक्रम, आंदोलने मी करू शकलो. हे माझ्या एकट्याचे काम नसून काँग्रेस पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्ते या सगळ्यांच्या सहकार्यामुळेच मी हे करू शकलो आहे. काँग्रेसचा कार्यकर्ता हीच काँग्रेस पक्षाची खरी ताकद आहे. पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना अधिक बळ देण्याचे काम आगामी काळात अधिक तीव्रतेने केले जाणार असून महानगरपालिका तसेच इतर निवडणुकांच्या दृष्टीने पक्षाची जोरदार बांधणी करण्यासाठी मी आणि माझे सर्व सहकारी जीवाचे रान करणार असल्याचे किरण काळे यांनी म्हटले आहे. 

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!