100 कोटी वसुलीप्रकरणी भुजबळ यांचे नाव समोर
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नाशिक – संगमनेर तालुक्याच्या पठारभागातील आंबीखालसा येथील मूळचे रहिवासी असलेले आणि सध्या मुंबई पोलीस दलातील पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या मूळगावी आंबी खालसातील शेतातील घरावर नुकताच सक्तवसुली संचालनालयाचे (ईडी)च्या पथकाने छापा टाकला. मात्र, पथकाच्या हाती काहीच लागले नाही. पथकाने फक्त पोलीस उपायुक्त राजू भुजबळ यांच्या आईवडिल व भावाचे जाबजबाब नोंदवून घेतले.
मुंबईचे तत्कालीन पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांनी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर केलेल्या शंभर कोटी रुपयांच्या वसुलीची सध्या चौकशी सुरू आहे. सिंग यांनी केलेल्या आरोपात दोन पोलीस अधिकार्यांच्या नावाचा उल्लेख आहे. त्यातील एक पोलीस उपायुक्त राजू भुजबळ असून ते मूळचे संगमनेर तालुक्यातील आंबी खालसा गावचे आहेत. ते अनेक वर्षांपासून कुटुंबासह मुंबईतच राहत आहेत. मात्र, त्यांची शेतजमीन व अन्य नातेवाईक आंबी खालसा येथे राहत आहेत. त्यांच्याकडे ईडीच्या अधिकार्यांनी चौकशी केली असता त्यांचे आंबी खालसामध्ये घर आणि नातेवाईक असल्याची माहिती मिळाली होती. त्यानुसार पथकाने आंबी खालसा गावातील भुजबळ यांच्या घरी मंगळवारी आले होते. तेव्हा त्यांचे नातेवाईक घाबरून गेले होते. अधिकार्यांनी भुजबळ यांच्या आईवडिल व भावाची सुमारे तीन तास कसून चौकशी केली. मात्र, त्यांच्या हाताला काहीच लागले नाही.