संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
सांगली : गावाचा सरपंच झाल्यावर कोणत्यान्-कोणत्या कामाच्या माध्यमातून ग्रामस्थांच्या डोळ्यात धुळफेक करून कसे पैसे कमावतात, हे पुन्हा समोर आले आहे. यामुळे गावात विकासकामे सुरू झाल्यावर ग्रामस्थांनी निवडून दिलेल्या ‘सरपंच’ या महाभागाच्या आर्थिक प्रत्येक हालचालीवर लक्ष ठेवले पाहिजे, असो.
आटपाडी तालुक्यातील करगणी येथील सरपंच गणेश लक्ष्मण खंदारे (वय 39) याला 40 हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने रंगेहाथ पकडले. करगणी ग्रामपंचायत कार्यालयाजवळ मंगळवारी (15 जून) ही कारवाई करण्यात आली. याप्रकरणी सरंपंचाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत समजलेली माहिती अशी की, तक्रारदार हे कॉन्ट्रॅक्टर असून त्यांनी करगणी येथून रस्ता काँक्रीट करण्याचे काम हाती घेतले आहे. या कामाचे बिल मंजूर करुन जमा केल्याच्या मोबदल्यात करगणीचे सरपंच गणेश खंदारे याने बिलाच्या 4 टक्के रक्कम लाच म्हणून मागितली होती. याबाबत तक्रारदारांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली होती. लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने याबाबत पडताळणी केली असता सरपंच खंदारे याने तक्रारदारांकडे 40 हजार रुपयांच्या लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.
अशी केली लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने कारवाई 👉
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने तक्रादाराच्या तक्रारीनुसार करगणी ग्रामपंचायतीजवळ सापळा रचला. त्यानंतर सरपंच खंदारे याला तक्रारदारांकडून 40 हजार रुपयांची लाच स्वीकारताना त्यास रंगेहाथ पकडण्यात आले. अखेर याप्रकरणी संरपंचाविरुद्ध आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.
लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे उपाधीक्षक सुजय घाटगे, पोलीस निरीक्षक गुरुदत्त मोरे, प्रशांत चौगुले, कर्मचारी संजय कलकुटगी, अविनाश सागर, संजय संकपाळ, सलीम मकानदार, धनंजय खाडे, प्रीतम चौगुले, बाळासाहेब पवार यांनी ही कारवाई केली.