विवाहितेला जाळून ठार मारले ; पाथर्डी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी : माणुसकीला काळीमा फासणारी घटना पाथर्डी तालुक्यातील वडगाव येथे घडली. या घटनेत विवाहित युवती कीर्ती अनिकेत धनवे (वय २२, रा. वडगाव) हिला जाळून ठार मारल्याची घटना घडली. या घटनेनंतर सासरच्या लोकांवर पाथर्डी पोलीस ठाण्यात खूनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
तालुक्यातील वडगाव येथील अनिकेत धनवे याचा विवाह २०२३ साली कीर्ती अंगरख (उल्हासनगर) यांच्याबरोबर झाला होता. परंतु या विवाहाला कीर्ती हिच्या सासूचा विरोध होता. कारण, सासूच्या भावाच्या मुलीबरोबर अनिकेत याचा विवाह करायचा होता. पण विवाह झाल्यानंतरही सासरा देखील विरोध करत होता. किर्ती हिचा सासू-सासऱ्यांनी अनेकवेळा मानसिक छळ केला. मंगळवारी (दि.१० फेब्रुवारी २०२५)ला दुपारी किर्ती हिला शेतातील गोठ्यात स्वयंपाक करण्यासाठी गेली असता तिला पती अनिकेत अंकुश धनवे, सासरे अंकुश होनाजी धनवे, सासू करुणा अंकुश धनवे यांनी जाळून ठार मारल्याची फिर्याद कीर्ती हिचे वडील संतोष अंग्रख (रा. उल्हासनगर, ता. कल्याण, जि. ठाणे) यांनी पाथर्डी पोलीस ठाण्यात दिली. या फिर्यादीवरून कीर्ती हिचे पती, सासू, सासरा यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पाथर्डी पोलिस ठाण्याचे पोनि संतोष मुटकुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनि शिवाजी तांबे हे पुढील तपास करत आहेत.
विवाहिता कीर्ती धनवे ही या घटनेत पूर्णतः जळाल्याने तिचा मृत्यू झाला. घटना घडल्यानंतर मयत कीर्ती हिस पाथर्डी येथील उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. यावेळी तेथे आलेल्या कीर्तीच्या आई-वडिलांनी मृतदेह पाहताच टाहो फोडला.