कर्डिलेंचा प्रचार करत असल्याने बाचकर यांना तनपुरेंची फोनवरून धमकी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
राहुरी : राहुरी विधानसभा मतदारसंघात प्रचार शिगेला पोहोचला असताना उमेदवाराच्या समर्थकांना धमकावण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे उमेदवार विद्यमान आमदार प्राजक्त तनपुरे यांचे वडील माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी धनगर समाजाचे नेते अण्णासाहेब बाचकर यांना फोनवरून धमकी दिल्याच्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. या प्रकरणी पोलिस संरक्षणाची मागणी बाचकर यांनी केली आहे. अखिल भारतीय धनगर परिषदेचे प्रदेश अध्यक्ष दत्तात्रय खेमनर यांनी सर्व धनगर समाज आता तनपुरे यांचा पराभव केल्याशिवाय राहाणार नाही, असा इशारा दिला आहे.
राहुरी विधानसभा मतदारसंघात तीव्र राजकीय घमासान सुरू आहे. आ. तनपुरे यांचे वडील माजी खा. प्रसाद तनपुरे यांनी अण्णासाहेब बाचकर यांना फोनवरून धमकी दिल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली आहे. तनपुरेंच्या विरोधात जाणे सोपे नाही. “इथून पुढे कुणी काही केले, तर माफी करणार नाही. तुम्हाला काही अडचणी आल्या तर आमच्याकडे येता, कर्डिले काय तुमच्या संघटनेचे आहेत का?” अशा प्रकारचे संभाषण क्लीपमध्ये आढळते. प्रचारादरम्यान कर्डिले यांच्यावर गुंडगिरीचे आरोप तनपुरे समर्थकांकडून केले जात आहेत. आता सुसंस्कृत म्हणवून घेणाऱ्या तनपुरे यांनीच सामान्य कार्यकर्त्याला धमकवण्याचा प्रयत्न केल्याने कार्यकर्त्यांनी निषेध व्यक्त केला आहे. तनपुरे यांच्या पायाखालची वाळू सरकल्यानेच अशा प्रकारे दहशत करून धमकावण्याचे प्रकार सुरू झाले असल्याचा आरोप होत आहे. पत्रकार परिषदेत खेमनर यांनी सांगितले की, धनगर समाजाचा हा अपमान असून संपूर्ण समाज नाराज झालेला असून आमदार तनपुरे यांचा पराभव केल्याशिवाय आम्ही आता थांबणार नाही.
यावेळी ज्येष्ठ नेते राजूमामा तागड, माजी संचालक अर्जुन बाचकर, संजय तमनर, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष अमोल भनगडे, राजेंद्र उंडे, नयन शिंगी, गोपीनाथ तमनर, वामन कोपनर, ऋतुराज शिंदे राहुल बाचकर आदी उपस्थित होते.