विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याची चांगली तयारी – विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा

विधानसभा निवडणुकीसाठी जिल्ह्याची चांगली तयारी – विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगरमहाराष्ट्रासाठी भारत निवडणूक आयोगाने नियुक्त केलेले विशेष निवडणूक निरीक्षक राम मोहन मिश्रा यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. त्यांनी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात विविध यंत्रणांमध्ये समन्वय, निवडणूक प्रशासनाची पूर्वतयारी आणि निवडणुका मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांबद्दल समाधान व्यक्त केले.

जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. मिश्रा यांनी निवडणूक विषयक तयारीचा आढावा घेतला. यावेळी भारत निवडणूक आयोगाने विविध विधानसभा मतदारसंघासाठी नियुक्त केलेले निवडणूक पोलीस निरीक्षक, सर्वसाधारण निवडणूक निरीक्षक, खर्च निरीक्षक, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी सिद्धाराम सालीमठ, जिल्हा पोलिस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी आशिष येरेकर, उपजिल्हा निवडणूक अधिकारी राहुल पाटील, निवडणूक निर्णय अधिकारी आदी उपस्थित होते.

श्री. मिश्रा यांनी यावेळी जिल्ह्यातील सर्व मतदारसंघातील निवडणूक विषयक तयारीची माहिती घेतली. त्यांनी निवडणूक निरीक्षक आणि निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडून निवडणूक तयारी विषयी माहिती घेतली. जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी राबविण्यात येत असलेले उपक्रम चांगले असून शहरी भागात मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी नागरिकांशी संवाद साधणारे उपक्रम आयोजित करावे, चांगले उपक्रम राबविणाऱ्यांना सन्मानित करावे, अशी सूचना त्यांनी केली.

मतदारसंघाची स्थिती, मतदान केंद्र संख्या, मतदान केंद्रावर आवश्यक असलेल्या सोयीसुविधा आणि उपाययोजना, मतदान साहित्य वितरण केंद्र, कायदा आणि सुव्यवस्था, प्रतिबंधात्मक कार्यवाही, मतदारांची जनजागृती आदी विषयाबाबत त्यांनी मार्गदर्शन केले.

ते म्हणाले, निवडणूक यंत्रणेवरचा नागरिकांचा विश्वास वृद्धिंगत होईल, अशी कामगिरी करावी. अवैध मद्य किंवा पैशाची वाहतूक रोखण्यासाठी स्थिर सर्वेक्षण अणि भरारी पथकासोबतच विशेष पथकाद्वारे विविध भागात अचानकपणे वाहनांची तपासणी करावी. निवडणूक विषयक यंत्रणेकडे आलेल्या तक्रारींची वेळीच दखल घ्यावी आणि कालमर्यादेत निराकरण करावे. सिव्हिजीलद्वारे आलेल्या तक्रारींवर १०० मिनिटाच्या आत कार्यवाही होत असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केले. मतदान कर्मचाऱ्यांना आवश्यक प्रशिक्षण देण्यात यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.

यावेळी विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त निरीक्षक यांनीही जिल्ह्यातील सर्व मतदारसंघात आवश्यक पूर्वतयारी निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार होत असल्याचे सांगितले.

जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. सालीमठ यांनी यावेळी सादरीकरणाद्वारे जिल्ह्यातील निवडणूक यंत्रणेच्या तयारीची माहिती दिली. कमी मतदान असलेल्या मतदान केंद्रात सर्व सुविधा निर्माण करून प्रत्येक मतदारसंघात असे तीन आदर्श मतदान केंद्र असतील, असे त्यांनी सांगितले.निवडणुकीसाठी प्रशासन सज्ज असल्याचेही जिल्हाधिकारी म्हणाले.

आतापर्यंत विविध पथकाद्वारे २८ कोटी २६ लाख रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. शिर्डी आणि राहुरी मतदारसघांत प्रत्येकी एक सहाय्यकारी मतदान केंद्र स्थापित करण्यात येणार आहे. मतदानासाठी १२ हजार ५७२ अधिकारी-कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. २ हजार ३२ मतदान केंद्रांवर वेबकास्टिंग सुविधा करण्यात येणार आहे, अशी माहिती यावेळी देण्यात आली.

बैठकीनंतर श्री.मिश्रा यांनी माध्यम केंद्राला भेट देऊन तेथील कामकाजाची माहिती घेतली. सुनियोजित पद्धतीने होणारे माध्यम संनियंत्रण आणि समाज माध्यमावरील जाहिराती आणि चुकीच्या पोस्टबद्दल बारकाईने लक्ष ठेवण्यासाठी करण्यात येत असलेल्या प्रयत्नांचे त्यांनी कौतुक केले. माध्यम केंद्राच्या कामात उत्तम नियोजन दिसून येत असल्याचे ते म्हणाले.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!