संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नवीदिल्ली – केंद्र सरकारने फेक न्यूज फसरवणाऱ्या 2 वेबसाईट आणि 20 यूट्यूब चॅनेलवर कारवाई केली आहे. भारतीय गुप्तचर संस्था आणि माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या संयुक्त प्रयत्नातून, या चॅनेल आणि साईट्सची ओळख पटवण्यात आली आहे. त्यामुळे सरकारने या चुकीच्या बातम्या पसरवणाऱ्या यूट्यूब चॅनेल्सला बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. सरकारने बंदी घातलेल्या यूट्यूब चॅनेलमध्ये द पंच लाइन, इंटरनॅशनल वेब न्यूज, खालसा टीव्ही, द नेकेड ट्रूथ अशा चॅनेलचा समावेश आहे.
माहिती प्रसारण मंत्रालयाने म्हटले आहे की, या सर्व चॅनेल्सला पाकिस्तानातून ऑपरेट करण्यात येत होते. काश्मीर, लष्कर, भारतातील अल्पसंख्याक समुदाय, राम मंदिर, सीडीएस जनरल बिपिन रावत यासारख्या विषयांवर खोट्या आणि चिथावणीखोर पोस्ट करण्यासाठी या चॅनेल्सचा वापर केला जात होता. तर काही यूट्यूब चॅनेल्स कृषी कायदे आणि CAA च्या विरोधात चुकीची माहिती पसरवत होते. तसेच भारतातील आगामी 5 राज्यांमध्ये होणाऱ्या निवडणुकांदरम्यान वातावरण बिघडवण्याची भीती व्यक्त केली जात होती. त्यापार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला आहे.
केंद्र सरकारने बंदी आणलेल्या या चॅनेल्सचे सुपारे 35 लाखांपेक्षा जास्त सब्सक्रायबर आहेत. तर त्यांचे व्हिडिओ 55 कोटींपेक्षा अधिकदा पाहण्यात आले आहेत. तर काही यूट्यूब चॅनेल्स हे पाकिस्तानी न्युज चॅनेल्सचे अँकर चालवत असल्याची माहिती आहे.