17 सप्टेंबर पासून अहमदनगर छावणी परिषद कार्यालय राबवणार स्वच्छता ही सेवा अभियान
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर: भारत सरकारच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत मिशनचा एक महत्त्वाचा भाग म्हणून दि. 17 सप्टेंबर पासून दि.2 ऑक्टोबर या कालावधीत अहमदनगर छावणी परिषद कार्यालयाद्वारे स्वच्छता ही सेवा अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. या वर्षी या अभियानाचे घोष वाक्य “स्वभाव स्वच्छता – संस्कार स्वच्छता” हे असणार आहे. समाजात स्वच्छतेबाबत जनजागृती करणे तसेच नागरिक यांचा अभियानात सहभाग वाढवणे, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता सुनिश्चित करणे आणि सफाई मित्र सुरक्षित अभियान राबवणे हा या अभियानाचा प्रमुख उद्देश आहे. या अभियानादरम्यान स्वच्छता प्रतिज्ञा, मॅरेथॉन, जनजागृती कार्यक्रम, स्वच्छतेच्या महत्त्वावर चर्चासत्र आणि कार्यशाळा, मेळावा, मानवी साखळी, सायकल रॅली, एक पेड मा के नाम, घरोघरी जनजागृती मोहीम, पर्यावरणपूरक पिशव्यांचे वितरण, सांस्कृतिक कार्यक्रम, सार्वजनिक ठिकाणांची स्वच्छता ई. उपक्रम स्थानिक नागरिक व संघटना यांच्या सहकार्याने राबविण्यात येणार आहेत. तसेच शाळेतील विद्यार्थी यांच्या सहकार्याने स्वच्छता रॅली, पथनाट्य, स्वच्छतेशी संबंधित कला, निबंध लेखन, क्रीडा स्पर्धा आयोजित करून त्यांचे पुरस्कार वितरण इत्यादि विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या अभियाना दरम्यान नागरिकांसाठी प्लॅस्टिक कचरा व ई-कचरा संग्रहण केंद्र सुरू करण्यात येणार आहे.
या अभियानात सर्व नागरिक यांनी मोठ्या संख्येने योगदान देऊन आपले शहर स्वच्छ, सुंदर व हरीत करणे कामी आपले मोलाचे योगदान द्यावे असे आवाहन छावणी परिषदेचे अध्यक्ष ब्रिगेडिअर रसेल डिसोजा, मुख्य कार्यकारी अधिकारी विक्रांत मोरे व नामनिर्देशीत सदस्य वसंत राठोड यांच्याकडून करण्यात आले आहे.