दारू पिऊन आई, स्वत:च्या मुलास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत असे… पाथर्डीत अहिल्यानगर क्राईम ब्रॅँचची कारवाई
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी ः सतत दारू पिऊन आई व त्याच्या स्वत:च्या मुलास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देणारा व स्वत:च्या मुलास जीवे मारून विहीरीत टाकण्याची धमकी देत असणारा दारुड्या भाऊ यास मारहाण केल्याने, त्यात मयत झाल्याप्रकरणी मयताचा भाऊ डॉ.अशोक रामराव पाठक, (वय 39, रा.सातवड, ता.पाथर्डी, जि.अहिल्यानगर हल्ली रा.साईविरा बिल्डींग, नवनाथनगर, ता.राहाता, जि.अहिल्यानगर) यास पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधीक्षक प्रशांत खैरे व शेवगाव डिवायएसपी सुनिल पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली अहिल्यानगर क्राईम बॅ्रँच पोनि दिनेश आहेर यांच्या सूचनेनुसार पोसई अनंत सालगुडे, पोलीस अंमलदार सुरेश माळी, ज्ञानेश्वर शिंदे, संदीप दरंदले, विजय ठोंबरे, अरूण गांगुर्डे, किशोर शिरसाठ, बाळासाहेब खेडकर, फुरकान शेख, मेघराज कोल्हे, प्रशांत राठोड व चंद्रकांत कुसळकर आदींच्या टीमने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.10 मार्च 2025 रोजी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास त्यांच्या शेतातील संत्र्याच्या बागेमध्ये मुलगा सोमनाथ रामराव पाठक हा मयत अवस्थेत मिळून आला, या सौ.सिंधुबाई रामराव पाठक (रा.सातवड, ता.पाथर्डी) यांनी दिलेल्या खबरीवरुन पाथर्डी पोलीस ठाण्यात अ.मृ.र.नं. 43/2025 प्रमाणे अकस्मात मृत्यू दाखल करण्यात आला.अकस्मात मृत्यूचे तपासात अज्ञात आरोपीने अज्ञात कारणावरून मयत सोमनाथ रामराव पाठक (वय 32, रा.सातवड, ता.पाथर्डी) याच्या शरीराच्या विविध भागावर मारहाण करून जीवे ठार मारले. याबाबत पाथर्डी पोलीस स्टेशन गुरनं 226/2025 बीएनएस 103 (1) प्रमाणे गुन्हा दाखल आहे.
अहिल्यानगर एसपी ओला यांना ना उघड खुनाच्या गुन्ह्याची प्राथमिक माहिती मिळताच त्यांनी क्राईम बॅँ्रचचे पोनि श्री.आहेर गुन्ह्याचा समांतर तपास करणेबाबत आदेश दिले. त्यानुषंगाने पोनि श्री.आहेर यांनी क्राईम ब्रॅँच टीम नेमून गुन्ह्यातील आरोपींची माहिती व शोध घेणेबाबत सूचना दिल्या.
दि.11 मार्च 2025 रोजी पथक पाथर्डी पोलीस ठाणे हद्दीत तांत्रीक विश्लेषण व साक्षीदराकडे केलेल्या चौकशीतील विसंगतीवरून गुन्हयाचा तपास करत असताना गुन्हा हा अशोक पाठक याने केल्याचे निष्पन्न झाले. क्राईम ब्रॅँच टीमने निष्पन्न आरोपीचा शोध घेऊन त्यास ताब्यात घेतले. त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव डॉ.अशोक रामराव पाठक असे असल्याचे सांगितले. ताब्यातील आरोपीकडे गुन्हयाचे अनुषंगाने विचारपूस केली. या दरम्यान त्याचा मयत भाऊ सोमनाथ रामराव पाठक यास दारू पिण्याची सवय होती. तो सतत दारू पिऊन आई व त्याच्या स्वत:च्या मुलास मारहाण करून जीवे मारण्याची धमकी देत होता. स्वत:च्या मुलास जीवे मारून विहीरीत टाकण्याची धमकी देत होता.
ताब्यातील डॉ.अशोक पाठक हा दि.9 मार्च 2025 रोजी त्याचा मयत भाऊ यास समजावून सांगण्यासाठी सातवड (ता.पाथर्डी) येथे आला. त्यावेळी मयत हा दारू पिलेला होता, डॉ.अशोक पाठक हा मयतास समजावून सांगत असताना त्याने पुन्हा त्याची आई व स्वत:च्या मुलास मारण्याची धमकी दिली. त्यावेळी डॉ.अशोक पाठक याने लाकडी दांडक्याने मयताचे डोक्यावर, पाठीवर, छातीवर व पायावर मारहाण केली. त्यावेळी मयत हा त्याच्या संत्र्याच्या शेतात पळाला. त्यावेळी डॉ.अशोक पाठक हा त्यामागे जाऊन त्याने मयतास मारहाण करून त्याचे हात बांधून संत्र्याच्या झाडाला बांधले. त्यावेळी मयताची हालचाल थांबल्याने डॉ.अशोक पाठक यांनी त्याला सोडले.त्यानंतर डॉ.अशोक पाठक हा कोणाला काहीही माहिती न सांगता तेथून निघून गेला असल्याची माहिती दिली. यानंतर सौ.सिंधुबाई रामराव पाठक ( रा.सातवड, ता.पाथर्डी) या दि.10 मार्च 2025 रोजी पहाटे 5.30 वाजण्याच्या सुमारास शेतातील मोटार चालू करण्यासाठी गेल्या. यावेळी त्यांना त्यांच्या शेतातील संत्र्याच्या बागेमध्ये मुलगा सोमनाथ रामराव पाठक हा मयत अवस्थेत मिळून आला, अशी खबर त्यांनी पाथर्डी पोलीसांना दिली. ताब्यातील आरोपीस गुन्ह्याच्या तपासकामी पाथर्डी पोलीस ठाण्यात हजर करण्यात आले. गुन्हयाचा पुढील तपास पाथर्डी पोलीस हे करीत आहेत.