👉विभागीय आयुक्तांनी घेतला निवडणूक तयारीचा आढावा
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : विधान परिषद पदवीधर मतदार संघाच्या निवडणूकीसाठी नियुक्त प्रत्येक सूक्ष्म निरीक्षकांनी (मायक्रो ऑब्जरवर) नियमांचे व सूचनांचे काटेकोरपणे पालन करत दक्ष राहून आपले कर्तव्य बजवावे. अशा सूचना नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाचे निवडणूक निरीक्षक डॉ. निपुण विनायक यांनी आज येथे दिल्या.


नाशिक विभाग पदवीधर मतदार संघाच्या निवडणुकीसाठी नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांची (मायक्रो ऑब्जरवर) जिल्हाधिकारी कार्यालयात श्री. विनायक यांच्या अध्यक्षतेखाली बैठक झाली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तथा नाशिक विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी डॉ.राजेंद्र भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक राकेश ओला, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.आशिष येरेकर, उप जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पाटील आदी उपस्थित होते.
श्री. निपुण विनायक म्हणाले की, निवडणूक नियमांचा बारकाईने अभ्यास करण्यात यावा. निवडणूक मुक्त, निर्भय, निष्पक्ष व अत्यंत शिस्तबद्धरीतीने पार पाडण्याच्या दृष्टीने कामकाजाचा आढावा घेण्यात यावा.

मतदान केंद्रावर सोयी-सुविधा उपलब्ध करून द्या – विभागीय आयुक्त
जिल्ह्यातील १४७ मतदान केंद्राची अधिकाऱ्यांनी प्रत्यक्ष पहाणी करुन त्या ठिकाणी कुठल्याही बाबींची उणीव भासणार नाही, याची खातरजमा करुन घ्यावी. मतदान केंद्रावर पिण्याचे पाणी, विद्युत व्यवस्था, वैद्यकीय सुविधा, स्वच्छतागृह आदी सर्व सोई-सुविधा उपलब्ध राहतील, यादृष्टीने सुक्ष्म नियोजन करावे. दिव्यांग मतदारांना मतदानासाठी मतदान केंद्रामध्ये प्रवेशासाठी रॅम्पची उभारणी करावी. तसेच मतदानाच्या दिवशी या सर्व केंद्रात व्हिडिओ चित्रीकरणाची व्यवस्था करण्यात यावी. अशा सूचना विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे त्यांनी यावेळी दिल्या.
निवडणूकीच्या काळात कायदा व सुव्यवस्था अबाधित राहून निवडणुका शांततेमध्ये व सुरळीतपणे पार पडण्यासाठी पोलीस विभागाने पुरेशा प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात करावा. अवैधरित्या कुठल्याही प्रकारची वाहतुक होणार नाही याचीही विशेष काळजी घेण्याच्या सूचनाही श्री. गमे यांनी यावेळी दिल्या.
बैठकीस सर्व उपजिल्हाधिकारी, उप विभागीय अधिकारी, तहसीलदार, नायब तहसिलदार, गटविकास अधिकारी, पोलीस, परिवहन, राज्य उत्पादन शुल्क व विद्युत विभागाचे अधिकारी यांच्यासह निवडणुकीसाठी नियुक्त प्रमुख अधिकारी उपस्थित होते.