संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नवीदिल्ली- मी सुवर्णपदक जिंकेन असे वाटले नव्हते. त्यामुळे मला आता खूप छान वाटत आहे. मला या कामगिरीवर विश्वास बसत नसल्याचे उद्गार भारताचा भालाफेकपटू नीरज चोप्राने ऐतिहासिक सुवर्णपदक जिंकल्यानंतर काढले. नीरजसाठी आणि भारतीय खेळांसाठी शनिवारचा दिवस ऐतिहासिक ठरला. नीरजने ऑलिम्पिकच्या अॅथलेटिक्स स्पर्धांतील एका शतकापासून असलेला भारताचा पदकाचा दुष्काळ संपवला. तीन दिवसांपूर्वीच पात्रता फेरीत पहिला क्रमांक पटकावल्यावर त्याने अंतिम फेरीतही उत्कृष्ट कामगिरी केली. त्याने ८७.५८ मीटर अंतराची नोंद करत सुवर्णपदक जिंकले आणि ऑलिम्पिकच्या अॅथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक जिंकणारा पहिला भारतीय होण्याचा मान मिळवला.
‘मला या कामगिरीवर विश्वास बसत नाहीये. ऑलिम्पिकच्या अॅथलेटिक्स स्पर्धांत भारताला पहिल्यांदाच पदक जिंकता आले आहे. त्यामुळे मला खूप छान वाटत आहे. आपल्याला (भारत) इतर खेळांत मिळून केवळ एक वैयक्तिक सुवर्णपदक जिंकता आले आहे. आपल्या देशाला बऱ्याच काळानंतर सुवर्णपदक जिंकण्यात यश आले. त्यामुळे हा माझ्यासाठी आणि देशासाठी अभिमानाचा क्षण आहे,’ असे नीरजने सांगितले.