संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राहुरी : जगप्रसिद्ध असलेल्या शिर्डीच्या साईबाबा मंदिराच्या विश्वस्त पदाच्या निवडीच्या हालचाली जोरात सुरू आहेत. यामध्ये अनेक राजकीय मंडळींना विश्वस्त पदावर घेतले जाते. या संचालक मंडळात आता जिल्ह्यातील नामवंत पत्रकारातून एकाला संधी द्यावी अशी मागणी अखिल भारतीय क्रांतीसेनेचे प्रदेश संपर्क प्रमुख मधुकर म्हसे यांनी केली आहे.
याबाबबत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांना निवेदन पाठविले आहे. त्याबरोबरच उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूलमंत्री बाळासाहेब थोरात, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले आदींना निवेदनाची प्रत पाठविण्यात आली आहे.
या निवेदनात म्हसे यांनी म्हटले आहे की, साईबाबा संस्थानच्या विश्वस्त मंडळात पत्रकारांची नियुक्ती महत्वाची ठरणार आहे. लोकशाहीचा चौथा स्तंभ म्हणून पत्रकारांकडे पाहिले जाते. या चौथ्या आधार स्तंभाने शासनाच्या योजनांची दिल्लीपासून गल्लीपर्यंत अंमलबजावणी व्हावी, यासाठी सदैव सकारात्मक भूमिका घेऊन कामकाज केले आहे. तसेच शासनावर आपल्या लेखणीतून ताशेरे ओढलेले आहे.
साईबाबा संस्थानचा कारभार काटेकोरपणे चालण्यासाठी व त्यावर नियंत्रण राहण्यासाठी पत्रकारांची नियुक्ती होणे गरजेचे आहे. त्यामुळे शिर्डीच्या साईबाबा मंदिर संस्थानच्या विश्वस्तपदी जिल्ह्यातील पत्रकाराची नियुक्ती करून पञकार प्रतिनिधी म्हणून संधी द्यावी, अशी मागणी म्हसे यांनी निवेदनात केली आहे.