श्री संत वामनभाऊ महाराजांच्या पालखीचे रविवारी पंढरपुरकडे प्रस्थान
सोमराज बडे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online news Natwork
पाथर्डी : श्री क्षेत्र पंढरपूर येथे आषाढ वारी साठी संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखीचे रविवारी (१८ जून) दुपारी गहिनाथ गडावरून पंढरपुरकडे प्रस्थान होणार आहे. श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे मठाधिपती महंत श्री. विठ्ठल महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली श्रीक्षेत्र गहिनीनाथगड येथून श्री संत वामनभाऊ महाराज यांच्या पालखी बरोबर दरवर्षी जवळपास ५० ते ६० हजार वारकरी या दिंडीत सहभागी होत असतात.
श्रीगहिनीनाथ महाराज व श्री संत वामनभाऊ महाराज यांचा गुरुपरंपरेनुसार अभिषेक होईल त्यानंतर श्रीक्षेत्र गहिनीनाथ गड येथे दुपारचे भोजन झाल्यानंतर दुपारी दोन ते चार दरम्यान गहिनीनाथ गड येथून अतिशय उत्साहात या भव्य दिव्य दिंडीचा पुढील प्रवास सुरू होईल.
त्यानंतर निवडुंगा येथे पहिला मुक्काम होणार आहे. सोमवारी दि.१९ जूनला वाहली, सावरगाव, वनवेवाडी असा प्रवास करत मातकुळी ता.आष्टी येथे दींडीचा दुसरा मुक्काम होईल. त्याचप्रमाणे मंगळवारी दि.२० जूनला जांबवाडी जामखेड जगदाळे वस्ती असा प्रवास झाल्यानंतर संत वामनभाऊ गड जमादारवाडी येथे दिंडीचे प्रमुख आकर्षण असलेले पहिले गोल रिंगण होईल व सारोळा येथे दींडीचा मुक्काम होईल.
बुधवारी दि.२१जूनला सारोळा वस्ती, खुर्दैठण, घोडेगाव, आपटी, पिंपळगाव वस्ती, असा प्रवास करून पिंपळगाव उंडा येथे दिंडी मुक्कामास पोहोचेल. गुरुवारी दि.२२ जूनला सकाळी पिंपळगाव वस्ती, जवळके, जाधव वस्ती, शिंदे वस्ती चिंचपूर मशिदीचे व भिलारे वस्ती, पांढरेवाडी, आटोळे वस्ती, शेळगाव असा प्रवास करून तांदळवाडी येथे मुक्काम करेल. शुक्रवारी दि. २३ जून रोजी देऊळगाव, डोणजे कसाबाचे, बंगाळवाडी असा प्रवास करून मिरगव्हाण येथे मुक्काम करील. शनिवारी दि.२४ जून रोजी मिरगव्हाण वस्ती, नागोबाचे हिवरे, सालसे, आळसुंदे वस्ती असा प्रवास करून वरकुटे मूर्तीचे येथे दिंडीचा मुक्काम होईल. रविवार दि. २५जून रोजी वरकुटे येथून दिंडीचा पुढील प्रवास सुरू होऊन रोपळे, असा प्रवास झाल्यानंतर आठरे येथे दिंडीचे दुसरे महत्वाचे रिंगण होईल त्यानंतर भोगेवाडी वस्ती, भोगेवाडी येथे मुक्काम होईल. सोमवार दिनांक २६ जून रोजी ढवळस, पिंपळखुंटे, अंबड, शिराळाचे गोठे, भेंड असा प्रवास करून संत सावता महाराज यांचे श्रीक्षेत्र आरण येथे दिंडीचा मुक्काम होईल. मंगळवार दि. २७ जून रोजी बारडी, जाधव वाडी, पवार वस्ती फाटा, मेंढापूर पाटील वाडा असा प्रवास करून पादुका रिंगण होईल व दिंडी श्रीक्षेत्र पंढरपूर येथे पालखी दाखल होईल.