श्री संत भगवानबाबा यांनी प्रारंभ केलेल्या नारळी अखंड हरिनाम सप्ताहाचे स्वरूप, व्याप्ती व महती याविषयी श्री क्षेत्र भगवानगडाचे मठाधिपती, ह.भ.प.न्यायाचार्य डॉ.श्री.नामदेव महाराज शास्त्रीजी यांनी लिहिलेला विशेष लेख…..
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
ऐश्वर्यसंपन्न संत श्री भगवानबाबांचा ८९ वा नारळी सप्ताह
संत-महापुरुषांचं एकत्रीकरण म्हणजे अखंड हरिनाम सप्ताह. विचारांची देवाणघेवाण, तत्त्वज्ञानावर चर्चासत्र, अनेक महापुरुषांना अभिप्राय व्यक्त करण्याचे व्यासपीठ. सामान्यांचे एकत्रीकरण, एकत्र जेवण, निर्व्यसनीपणाचे प्रशिक्षण, जीवनाविषयीची गंभीरता, ईश्वराविषयी प्रेम, जीवन व संसाराची अनित्यता, सुख दुःखाची जाण, स्वतःविषयीचे ज्ञान व जगण्याचे भान देणारा हा अखंड हरिनाम सप्ताह असतो. संतांच्या ग्रंथांमधील न समजणारे सिद्धांत इथे समजून सांगितले जातात. भारताचा इतिहास व संस्कृतीचे विवेचन केले जाते. ऋषींचं मत व साधूंचं मनोगत इथे आचरणात आणण्याचे शिकविले जाते. आरोग्याची काळजी व योगप्रशिक्षण यात दिलं जातं. देव, भक्त व नाम ही त्रिवेणी म्हणजे नामसप्ताह होय. इथे वाल्याचा महर्षी वाल्मीक होतो. हीच संतांची प्रतिज्ञाही आहे.
👇 सप्ताहाचे वैशिष्ट्य म्हणजे अधिकाराप्रमाणे प्रत्येकाला आचरणाची मुभा दिली जाते. जात, पात, धर्म हे वारकरी संप्रदायात पहिल्यापासून नाहीत. इथे जो देवावर प्रेम करतो, तीच एक जात मानली जाते. स्त्री आणि पुरुष हा भेद नाही. इथे कोणत्याही अभंगावर विश्लेषणे होतात. संत सावता महाराज, संत चोखोबाराय, संत सेना महाराज, संत गोरोबाकाका, संत नरहरी महाराज, संत नामदेव महाराज, संत लतीप शाह, सजन कसाई इत्यादी सर्व संतवृंद एकतत्वाचे व एकमताचे आहेत. त्यांचा धर्म व जात कोणती आहे, हे पाहिलं जात नाही. नैतिक आचरण, त्याग व ईश्वराविषयी प्रेम हेच सिद्धांत महत्त्वाचे आहेत. धर्मांधता नको; पण अंतःकरण मोठं पाहिजे. उदारता पाहिजे. दिखाऊ प्रेम नको, देखणं प्रेम पाहिजे. त्याग हा बोलण्यात नव्हे तर वागण्यात दिसला पाहिजे. स्वतःचं अस्तित्व वाढविण्यासाठी हा सप्ताह नाही. अर्थात संप्रदायाचा, संतांच्या विचारांचा प्रचार व प्रसार यासाठी हा नामसप्ताह असतो. चांगल्याचा चांगल्यासाठी मेळावा आहे. या संतसभेत जर संतांपुढे गीता सांगण्याचा योग आला, तर त्याला ईश्वर साक्षात्कार होतो. साक्षात्कारापेक्षाही तो देवाचा आवडता होतो.
तैसा भूतळी आघवा l आन न देखे पांडवा ll जो गीता सांगे मेळावा l भक्तजनांचा l मग तयाचेनि पाडे l पडियंते मजपुढे ll नाहीचि गा मागेपुढे l न्याहाळीता ll
हा सप्ताह विधिपूर्वक होत असतो. पहाटे काकडा भजन असते. हे अभंग स्वतंत्र आहेत. या अभंगाला काकड्याचे अभंग व भूपाळ्या असे नाव आहे. या अभंगात जीवनाचे व भगवंताचे विशिष्ट पद्धतीचे वर्णन वेगळ्या छंदातून व चालीतून असते. पहाटे मन शांत असताना कोणता विचार मनात असावा, हा विचार करून हे अभंग तयार झाले आहेत. यानंतर सर्वांसाठी ज्ञानेश्वरी पारायण. साधारणतः पंधराशे ओव्या तीन तासांत व्हाव्यात. थोडा अल्पोपहार व नंतर गाथा भजन. हे गाथाभजन फार शांत पध्दतीने करायचे असते. इथे गाण्याला कमी महत्व असते. अभंग हे खोलवर रुजले पाहिजेत, एवढ्याच प्रमाणात संगीत असते. भजनाच्या अंतिम टप्प्यात विशिष्ट पद्धतीने नृत्य असते. या नृत्याला ‘पाऊल्या’ असे म्हणतात. यात नृत्याचे अनेक प्रकार आहेत. मृदंगाच्या साक्षीने, टाळांच्या गजरात भगवंताचे नामचिंतन करीत तालात ‘कोट’ आदी खेळले जातात. यातच फुगडी, प्रतिस्पर्धात्मक खेळ, खो-खो, घुमरी आदी खेळ रंगतात. जेवण आणि थोड्या विश्रांतीनंतर ज्ञानेश्वरी प्रवचन, भागवत किंवा रामायण इत्यादी निरुपणे होतात. हरिपाठ, जेवण, रात्री कीर्तन व कीर्तनांतर हरिजागर होतो. हे एक अध्यात्मिक शिबिरच असते. सतत संसाराचा विचार करणारं मन थोडं तत्वज्ञानाकडे वळतं. आपण का जन्माला आलो ? आपलं काय कर्तव्य आहे ? याची जाणीव निर्माण होते. कोणत्या सिद्धांतावर आपण विचार करावा, हे या सप्ताहात आपल्याला कळतं. अचानक जीवनाला धोका झाला, तर मनुष्याचा मानसिक तोल जाऊ शकतो. दुःखाची तीव्रता अधिक होऊ शकते. हेच जर संतसंगतीतून अगोदर कळलं तर मनुष्य सावध होतो.
नाशिवंत देह जाणार सकळ l
आयुष्य खातो काळ सावधान
सज्जनांचा मेळावा असणारा हा सत्संग सर्वांसाठी लाभदायक आहे. सर्वांची एकता साधणारा, जगण्याचं भान देणारा, मनुष्याला सन्मार्ग दाखविणारा असा हा नामसप्ताह असतो. हा अध्यात्मिक उत्सव महाराष्ट्रात सर्वत्र साजरा करतात. सर्व संतांचं अनुमोदन असून, सर्व फडकरी, मठकरी, संस्थानिक हा उपक्रम राबवतात. मराठवाड्यात श्री संत भगवानबाबांनी नारळी सप्ताह प्रारंभ केला. परिसरातील सर्व गावांनी सात दिवस एका गावात एकत्रित यायचं. सप्ताहाचं गांव दरवर्षी बदलत असतं. ज्या गावाला हा सप्ताह करायचा असेल, त्यांनी नारळाची मागणी करायची. त्याचं वर्ष ठरवून तो नारळ दिला जातो, म्हणून या अखंड हरिनाम सप्ताहाला 'नारळी सप्ताह' म्हणतात. चैत्र शुद्ध त्रयोदशी ही सप्ताहाच्या प्रारंभाची तिथी ठरलेली असते. आज या सप्ताहाचं स्वरुप फार विराट झालं आहे. संपूर्ण महाराष्ट्रातून विद्वान व भक्त मंडळी या सप्ताहासाठी मोठ्या प्रमाणात येतात. त्यांच्या जेवणाची सोय ज्या गावाने नारळ घेतलेला असतो ते गांवकरी करतात. त्या गावाला परिसरातील गांवकरी पूर्ण सहकार्य करतात. यावर्षी पाथर्डी तालुक्यातील मौजे भारजवाडी येथे दि.४ ते ११ एप्रिल या दरम्यान हा नारळी सप्ताह संपन्न होत आहे. श्री संत भगवानबाबांनी तुमच्या-आमच्यासाठी सुरु केलेल्या या ज्ञानयज्ञ सोहळ्याचा आपण प्रत्यक्ष अनुभव घ्यावा.
फोडिले भांडार धन्याचा हा माल l
तेथे मी हमाल भारवाही ll (तुकाराम गाथा- ३३५)
संकलन : निलेश ढाकणे, शेवगाव