संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर : खरीप हंगामात शेतकर्यांना वेळेवर कर्ज मिळणे आवश्यक आहे. त्यामुळे राष्ट्रीयकृत बॅंकांनी त्यांना वेळेवर कर्जपुरवठा करावा, असे निर्देश जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी दिले.
येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन समिती सभागृहात नुकतीच जिल्हास्तरीय समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. त्यावेळी ते बोलत होते. जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र क्षीरसागर, जिल्हा उपनिबंधक (सहकार) दिग्विजय आहेर, जिल्हा अग्रणी बॅंक व्यवस्थापक संदीप वालावलकर, नाबार्डचे जिल्हा उपमहाव्यवस्थापक शीलकुमार जगताप, आरसेटीचे व्यवस्थापक तुकाराम गायकवाड यांची यावेळी व्यासपीठावर उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले यांनी प्रत्येक बॅंकांनी आतापर्यंत वाटप केलेल्या पीककर्जाचा आढावा घेतला. अहमदनगर जिल्हा सहकारी बॅंक वगळता राष्ट्रीयकृत बॅंकांचे पीक कर्ज वाटपाचे प्रमाण अतिशय अल्प आहे. वास्तविक या बॅंकांनी शेतकर्यांना खरीप पीक कर्जासाठी वेळेत मंजूरी देणे आवश्यक आहे. खरीप हंगाम सुरु झाला आहे. अशावेळी वेळेवर कर्ज मिळाले नाही, तर शेतकर्यांना आर्थिक अडचणींचा सामना करावा लागतो. जिल्ह्याच शेती हा मुख्य उपजीविकेचे साधन आहे. त्यामुळे बॅंकांनी शेतकर्यांना वेळेवर कर्ज उपलब्ध करुन द्यावे. प्रत्येक बॅंकांना उद्दिष्ट्य ठरवून देण्यात आले आहे. असे असतानाही राष्ट्रीयकृत बॅंकांची कामगिरी समाधारकारक नाही. येत्या पंधरा दिवसात ही कामगिरी सुधारावी आणि कर्ज वितरणाचे प्रमाण वाढवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.
जिल्ह्यातील राष्ट्रीयकृत बॅंका आणि खासगी बॅंकांनी त्यांच्याकडील ठेवी आणि कर्ज वितरणाचे प्रमाण चांगले राहील, याकडे लक्ष द्यावे, अशी सूचनाही त्यांनी केली.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. क्षीरसागर यांनीही, जिल्ह्यात स्वयंसहायता बचत गटाने कर्ज प्रकरणासाठी दिलेले अर्ज ज्या बॅंकांकडे प्रलंबित आहेत, त्यांनी ते तात्काळ मार्गी लावावेत, अशी सूचना केली. ज्या बॅंकांनी स्वयंसहायता गटांना कर्ज देण्यात चांगली कामगिरी बजावली आहे, त्यांचे कौतुकही त्यांनी केले.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ. भोसले आणि मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. क्षीरसागर यांच्या हस्ते महिला बचत गटांना कर्जपुरवठा करण्यात चांगली भूमिका बजावणार्या आयसीआयसीआय, एचडीएफसी आणि इंडियन ओवरसीज बॅंकेच्या प्रतिनिधींचा सत्कारही करण्यात आला.
या बैठकीस विविध बॅंकांचे जिल्हा व्यवस्थापक, प्रतिनिधी तसेच राज्य शासनाच्या विविध महामंडळांचे व्यवस्थापक उपस्थित होते.