बैठकीला शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, संपर्कप्रमुख, खासदार, आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत बंडखोर आमदारांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
MUMBAI (मुंबई) -: राज्यातील महाविकास आघाडी सरकारमध्ये घडामोडींना वेग आलेला असतानाच Shivsena शिवसेनेच्या वतीने शनिवारी (दि.२५) राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठक शिवसेना भवनात शनिवारी दुपारी १ वाजता होणार आहे. या बैठकीस शिवसेनेचे सर्व नेते, उपनेते, संपर्कप्रमुख, खासदार, आमदार उपस्थित राहणार असल्याची माहिती आहे. या बैठकीत बंडखोर आमदारांबाबत मोठा निर्णय होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
बंडखोर आमदारांविरोधात कारवाई तसेच सध्या निर्माण झालेल्या राजकीय पेचाबाबत कायदेशीर लढाई आदी मुद्द्यांवर राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत मंथन होण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. त्यामुळे एकंदरीत वातावरण पाहता बंडखोरांच्या हाती सहजपणे सत्ता न देण्याच्या मानसिकतेत शिवसेना असून याविरोधात संघर्ष करण्याची पूर्ण तयारी शिवसेनेकडून केली जात आहे. दरम्यान, शुक्रवारी मातोश्रीवर शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांमध्ये एक महत्त्वाची बैठक पार पडली.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आदी नेत्यांमध्ये राज्यातील सत्तासंघर्षावर खलबते झाल्याची माहिती आहे. शुक्रवारी एकीकडे मातोश्रीवर ही बैठक पार पडत असतानाच दुसरीकडे विधान भवनात विधानसभेचे उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांच्या दालनात बंडखोर आमदारांवर कारवाई करण्यासाठीही हालचाली रात्री उशिरापर्यंत सुरू होत्या. याबाबत कायदेशीर मार्गाने लढाई लढण्यासाठी राज्याचे महाधिवक्ते आशुतोष कुंभकोणी यांचीही मदत घेण्यात आल्याची माहिती आहे.