शासकीय पदातून समाजातील प्रत्येक वंचित घटकाला न्याय देण्याचे कार्य व्हावे : जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : शासकीय सेवेत कायदे व नियमांचे पालन करताना माणुसकीची भावना जपली जावी आणि समाजातील प्रत्येक वंचित घटकाला न्याय मिळावा, अशी अपेक्षा जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ यांनी व्यक्त केली.
जिल्हाधिकारी कार्यालयात नागपूरच्या विदर्भ विकास मंडळाचे सदस्य सचिव डॉ. अर्जुन किसनराव चिखले आणि मंत्रालयातील नियोजन विभागात सह सचिव म्हणून कार्यरत विवेक बन्सी गायकवाड यांची भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्याबद्दल तसेच बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाबराव खरात यांचा जिल्हा सत्कार समितीच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. सालीमठ बोलत होते.
या कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्रकुमार पाटील, सेवानिवृत्त अपर जिल्हाधिकारी किसनराव लवांडे, दत्तात्रय बोरुडे, सेवानिवृत्त उपजिल्हाधिकारी अरुणराव उजागरे, किशोर राजगुरु, नाशिक विभागीय महाराष्ट्र स्टेट गव्हर्नमेंट मोफुसिल स्टेनोग्राफर्स असोसिएशनचे अध्यक्ष सुरेश आघाव, अहिल्यानगर महसूल कर्मचारी संघटनेचे अध्यक्ष राजेंद्र आंधळे, ग्राम महसूल अधिकारी संघटनेचे अध्यक्ष प्रशांत हासे आणि जिल्हा सत्कार समितीचे सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झालेल्या सत्कारमूर्तींचे अभिनंदन करताना जिल्हाधिकारी श्री. सालीमठ म्हणाले, “शासन सेवेमध्ये सेवाभाव अत्यंत महत्त्वाचा आहे. जनतेची सेवा हाच मुख्य उद्देश मनात ठेवून प्रत्येकाने समर्पित भावनेने काम करावे. शासकीय सेवेत मिळालेल्या पदामुळे आपल्याला प्रतिष्ठा मिळते, मात्र आपल्या कामातून पदाला प्रतिष्ठा मिळेल, यादृष्टीने प्रत्येक अधिकारी आणि कर्मचाऱ्याने कार्य करावे.”
ते पुढे म्हणाले, “जीवन जगताना प्रत्येकाला अडचणींना सामोरे जावे लागते. जगभरातील अनेक महापुरुषांनीही अडचणींवर मात करत इतिहास घडवला आहे. अपयशातूनच यशाची पायरी चढता येते, त्यामुळे प्रत्येकाने सकारात्मक दृष्टिकोन ठेवत जनकल्याणासाठी कार्य करावे.”
विवेक बन्सी गायकवाड म्हणाले, “शालेय जीवनात शिक्षकांनी दिलेले बाळकडू आणि विविध टप्प्यांवर मिळालेले मार्गदर्शन यामुळेच वडिलांचे स्वप्न आज पूर्ण होत आहे. या यशामध्ये अनेकांचे मोठे योगदान आहे. महसूल सेवेत उपजिल्हाधिकारी पदावर मुंबई येथे कार्यरत असताना जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक महत्त्वाची कामे यशस्वीरीत्या पार पाडली. कोविड काळातही महत्त्वाची भूमिका बजावली. भविष्यातही जनतेच्या कल्याणासाठी अधिक चांगल्या पद्धतीने काम करण्याचा माझा मनोदय आहे.”
ते पुढे म्हणाले, “भारतीय प्रशासकीय सेवेत निवड झाल्यानंतर अनेक ठिकाणी माझा सत्कार झाला. मात्र, अहिल्यानगरकरांनी दिलेल्या प्रेमाने मी भावूक झालो. आत्मविश्वास, इच्छाशक्ती, सकारात्मक दृष्टिकोन, क्रियाशीलता आणि महत्त्वाकांक्षा या पंचसूत्रीच्या आधारे निश्चित यश मिळू शकते.”
गुलाबराव खरात म्हणाले, “सन १९९८ मध्ये जिल्हाधिकारी श्री. सालीमठ यांच्या प्रेरणा आणि मार्गदर्शनामुळे महसूल सेवेत येण्याची संधी मिळाली. अहिल्यानगर जिल्ह्यात जिल्हा पुरवठा अधिकारी म्हणून कार्यरत असताना उत्कृष्ट अधिकारी म्हणून जिल्ह्याने गौरव केला गेला. चांगल्या कार्यामुळे मान-सन्मान मिळतो आणि आत्मविश्वासाने जगण्याची प्रेरणा मिळते. शासकीय सेवेत प्रत्येकाने पदाचा उपयोग चांगल्या कामासाठी करावा.” सत्काराबद्दल डॉ. अर्जुन किसनराव चिखले यांनी आयोजकांचे आभार मानले.
कार्यक्रमात दत्तात्रय बोरुडे, अशोक गायकवाड यांनीही मनोगत व्यक्त केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक सुरेश आघाव यांनी केले. सूत्रसंचालन व आभार डॉ. अमोल बागुल यांनी मानले.