👉भेंडा शासकीय कोविड सेंटरमध्ये स्व: गोपीनाथ मुंडे साहेब यांच्या पुण्यतिथी निमित्ताने “सकारात्मक जीवन शैली” विशेष व्याख्यान कार्यक्रम उत्साहात
👉लोकनेते गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान, भानसहिवरेचे मुख्य प्रवर्तक राजेंद्र कीर्तने यांच्या पुढाकाराने स्व: गोपीनाथराव मुंडे साहेब यांची पुण्यतिथी साजरी
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नेवासा -विरोधाभासी मूल्य एकमेकांना पूरक असतात. त्यामुळे प्रत्येकाने वेळेचे भान ठेवून उपस्थित माणसाला किंमत दिली पाहिजे, तसेच वास्तवाचे भान ठेवून समोरील व्यक्तीस घाबरून न देता मानसिक आधार द्या, असे प्रतिपादन क्रिस्टल हॉस्पिटलचे संचालक डॉ. ज्ञानेश्वर दराडे यांनी केले.
नेवासा तालुक्यातील भेंडा येथील नागेबाबा भक्तनिवासातील शासकीय कोविड सेंटरमध्ये सोशल डिस्टन्स नियमांचे पालन करून लोकनेते स्व: गोपीनाथराव मुंडे प्रतिष्ठान, भानसहिवरेचे मुख्य प्रवर्तक राजेंद्र कीर्तने यांच्या पुढाकाराने तसेच स्व: मुंडे यांच्या पुण्यतिथीचे औचित्य साधून “सकारात्मक जीवनशैली” या विषयावरील विशेष व्याख्यान कार्यक्रमात डॉ. दराडे बोलत होते. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून शेवगाव डिवायएसपी डॉ. सुदर्शन मुंडे, नेवासा तहसीलदार रुपेशकुमार सुराणा, नेवासा तालुका आरोग्य अधिकारी डॉ. अभिजीत सूर्यवंशी आदींसह मान्यवर उपस्थित होते. दरम्यान लोकनेते स्व: गोपीनाथराव मुंडे साहेब यांच्या प्रतिमेला सर्व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आले.
डॉ. दराडे पुढे म्हणाले, सकारात्मक राहण्यासाठी पाच गोष्टी प्रत्येकाने अंगीकारला पाहिजेत. प्रत्येकाचे जीवन हे भिन्न असून दुसर्यांच्या चुका मागील कारण शोधत बसू नका. आपण दुसऱ्याच्या मताचे शिकार बनायचे नाही. माणसाने वर्तमान काळात जगण्याची कला अवगत केली पाहिजे. मी बरा झालो पाहिजे, त्यापेक्षा हे जग सुखी झाले पाहिजे. ही भावना मनात ठेवून प्रत्येकाने सकारात्मक भावनेने हे सुंदर जीवन जगले तर स्वतः सुखी होणारच त्याबरोबर इतरांनाही सुखी ठेवण्याची कला तुमच्यात येईल, असे ते म्हणाले