👉नागपुरात बावनकुळेंना विजयासाठी करावा लागणार संघर्ष, अकोल्यात रणधुमाळी ; कोल्हापुरातून सतेज पाटील तर, धुळ्यामधून अमरिश पटेल बिनविरोध
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई- विधान परिषद निवडणुकीत 6 जागांपैकी 4 बिनविरोध निकाल लागणार. यामध्ये मुंबईच्या दोन जागा आणि कोल्हापूर आणि धुळे-नंदुरबार मतदारसंघ यांचा समावेश आहे. तर नागपूर आणि अकोला-वाशिम-बुलडाणा या दोन जागांचे निकाल अजूनही बाकी आहेत. यामध्ये नागपुरात भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे आणि काँग्रेसचे रविंद्र भोयर यांच्यात लढत आहे.
धुळे-नंदुरबार विधान परिषद जागेवर आमदार अमरिश पटेल यांची बिनविरोध निवड झाली आहे. महाविकास आघाडीचे उमेदवार गौरव वाणी यांच्यासह अन्य चौघा जणांनी माघार घेतल्यामुळे ही बिनविरोध निवड झाली आहे. दरम्यान, धुळे-नंदुरबार विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपकडून आमदार अमरिश पटेल यांना पुन्हा उमेदवारी देण्यात आली होती. तर महाविकास आघाडीने तळोदाचे नगरसेवक गौरव वाणी यांना उमेदवारी दिली होती.
कोल्हापुरात राज्यमंत्री सतेज पाटील यांच्याविरुद्ध भाजपच्या अमल महाडिकांसह, शौमिका महाडिक यांनी उमेदवारी अर्ज भरलेला होता. मात्र, काँग्रेस आणि भाजपमध्ये बिनविरोध करण्यावर एकमत झाले. धुळे-नंदूरबारमधून काँग्रेसने माघार घेण्याची भूमिका घेतल्यानंतर भाजपने अमल महाडिकांचा अर्ज मागे घेण्याची भूमिका घेतली. धनंजय महाडिकांच्या सूचनेुनसार अमल महाडिक आणि शौमिका महाडिकांनी अर्ज मागे घेतल्याने सतेज पाटील यांच्या विजयाचा मार्ग मोकळा झाला.