विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनचे अहिल्यानगरला स्वागत
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (video news)
अहिल्यानगर : भारतीय लष्कराच्या मुख्यालय दक्षिण कमांडच्या नेतृत्वाखाली आयोजित ‘विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉन’मध्ये सहभागी धावपटूंचे अहिल्यानगरमध्ये उत्साहाने स्वागत करण्यात आले.
पुणे येथे १५ जानेवारी २०२५ रोजी आयोजित ‘सैन्य दिवस’ कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर ४०५ किमीच्या प्रवासाचा एक भाग असलेल्या या मॅरेथॉनचे आयोजन १९७१ च्या भारत-पाक युद्धातील भारतीय सैन्याच्या देदीप्यमान विजयाचे स्मरण करण्यासाठी आहे.
१९४९ मध्ये फील्ड मार्शल कोडंदेरा एम. करिअप्पा ज्या दिवशी भारतीय लष्कराचे पहिले भारतीय कमांडर-इन-चीफ बनले त्या दिवसाच्या स्मरणार्थ दरवर्षी १५ जानेवारी रोजी ‘आर्मी डे’ सोहळ्याचे आयोजन करण्यात येते. यावर्षी हे आयोजन पुण्यात होणे ही महाराष्ट्रासाठी अभिमानाची बाब आहे.
या दिवसाच्या पार्श्वभूमीवर ६ डिसेंबर रोजी राज्यपाल सी.पी. राधाकृष्णन यांच्या हस्ते मुंबई येथून हिरवा झेंडा दाखवण्यात आलेली मॅरेथॉनचा नाशिक, अहिल्यानगर, कोल्हापूर मार्गे जाईल. १६ डिसेंबर रोजी पुणे येथे समारोप होईल. धावपटूंच्या संघात १५ मुख्य धावकांचा समावेश आहे, ज्यात कर्नल मनदीप सिंग मान (निवृत्त) आणि कॅप्टन पूजा मेहरा (निवृत्त) यांसारखे उल्लेखनीय धावक सहभागी आहेत. सोबत शहरातील ज्येष्ठ दिग्गज, स्थानिक नागरिक आणि उत्तीर्ण झालेले एनसीसी कॅडेट्स आहेत. धावपटूंचे स्वागत करण्यासाठी आणि १९७१ च्या भारत-पाक युद्धातील शूर योद्ध्यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी प्रत्येक ठिकाणी विशेष ‘ फ्लॅग इन’ आणि ‘ ‘फ्लॅग ऑफ’ समारंभ आयोजित केले गेले आहेत. प्रत्येक शहरात, ‘समर्थ भारत सक्षम सेना’ या संकल्पनेवर आधारित विशेष कार्यक्रम आयोजित केले जात आहेत.
विजय दिवस अल्ट्रा मॅरेथॉनचे धावपटू नाशिकहून आव्हानात्मक प्रवास पूर्ण करून ८ डिसेंबर २०२४ रोजी अहिल्यानगर येथे यशस्वीरीत्या पोहोचले. हिवरेबाजार येथून सरपंच पद्मश्री पोपटराव पवार यांच्या हस्ते हिरवा झेंडा दखवून त्यांना पुढे मार्गस्थ करण्यात आले. मॅरेथॉनचा जिल्हास्तरीय समारोप अहिल्यानगर किल्ला परिसरात झाला.
अहिल्यानगर येथील मिलिटरी हॉस्पिटलचे ब्रिगेडियर वाणी सूर्यम यांनी धावपटूंचे स्वागत केले. आर्मर्ड कॉर्प्स सेंटर आणि मेकॅनाइज्ड इन्फंट्री सेंटरच्या पाईप बँड्सच्या देशभक्तीपर संगीत मैफिलीने कार्यक्रम आणखी चैतन्यमय झाला. यावेळी वर्षा पंडित यांनी देशभक्तीपर गीत सादर करुन उपस्थितांची मने जिंकली.
यावेळी ऍथलेटिक क्लब, अनुभवी मॅरेथॉनर्स, शाळकरी विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स, वीर नारी आणि नागरिक उपस्थित होते.
हिवरेबाजार ते अहिल्यानगर किल्ल्यापर्यंतच्या संपूर्ण मार्गावर, नागरिक उत्साहाने मॅरेथॉनमध्ये सहभागी झाले. मुख्य धावपटूंसोबत लहान मुले आणि तरुण धावपटू धावत होते. उत्साहवर्धक वातावरणात अहिल्यानगरने आपल्या क्रीडा संस्कृती आणि सशस्त्र दलांबद्दलचा आदराचे दर्शन घडविले. अहिल्यानगरची सशस्त्र दलाप्रती असणारी अभिमानाची भावना यानिमित्ताने प्रदर्शित झाली.
अहिल्यानगर येथील आर्मर्ड कॉर्प्स सेंटर अँड स्कूलचे कमांडंट मेजर जनरल विक्रम वर्मा यांच्या नेतृत्वाखाली कोल्हापुरला भव्य फ्लॅगऑफ कार्यक्रमात सशस्त्र दलाचे जवान, त्यांचे कुटुंबीय, विविध क्षेत्रातील मान्यवर आणि वीर नारी धावणार आहेत. याव्यतिरिक्त, अहिल्यानगर जिल्ह्यातील माजी सैनिकांना लाभ देण्यासाठी माजी सैनिक मेळा आणि लष्करी उपकरणे प्रदर्शनासह अनेक उपक्रमांचे आयोजन कॅव्हलरी टँक संग्रहालयात केले जाणार आहे.