नगर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहिण योजनेबाबत महिलांशी साधला संवाद
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
नगर ः लाडकी बहिण योजनेसंदर्भात महिलांशी संवाद साधण्यास सुरुवात नगर जिल्ह्यातून केली असून हे माझे आजोळ असून माझा जन्म देखील याच जिल्ह्यात झाला आहे. महिला आर्थिकदृष्ट्या म्हणाव्या तेवढ्या सक्षम नाही, त्यांना सक्षम करायचे आहे, छ. शिवाजी महाराज आणि शाहू, फुले, आंबेडकर विचारांचे प्रगतशील राज्य आहे. माझी लाडकी बहिण योजनेसाठी 45 हजार कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. त्यांना महिन्याला 1500 देण्यात येणार आहे. या माध्यमातून महिला आपल्या कुटुंबाला व मुलाबाळांना आर्थिक हातभार लावतील, महिला आपल्या कुटुंबासाठी झटत असतात, गरिबांची मला जाणीव आहे, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.
नगर शहरात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी माझी लाडकी बहिण योजनेबाबत महिलांशी संवाद साधला , यावेळी आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी महिला बालकल्याणमंत्री आदिती तटकरे, महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकर, माजी आ. अरुण जगताप, आ.संग्राम जगताप, शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर. मा.उपमहापौर गणेश भोसले, कुमारसिंह वाकळे, अविनाश घुले, महिला शहर जिल्हाध्यक्षा रेश्मा आठरे आदिंसह महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.
उपमुख्यमंत्री श्री पवार पुढे म्हणाले की, या योजनेत कोणतीही जातपात धरली नसून सरसकट 21 ते 65 वयोगटातील महिलांना याचा लाभ मिळेल, तसेच आता वर्षातून 3 गॅस सिलेंडरचे पैसे सरकार ग्राहकांच्या खात्यावर जमा करणार आहे, पण विरोधी पक्ष चांगल्या योजनेला विरोध करत आहे, चांगल्या कामाला पाठींबा दिला पाहिजे. आ. संग्राम जगताप नेहमीच शहर विकासाचे कामे घेवून येत असतात व ते मार्गी लावून देखील घेतात, प्रशासनाने जर लाडकी बहिण योजनेबाबत अर्ज भरताना पैसे मागितल्यास थेट त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल. लाडकी बहिण योजनेबरोबरच लाडक्या भावासाठी राज्य सरकार निर्णय घेत आहे. शेतक-यांना आम्ही वीजबिल माफ केले आहे, आता इथून पुढे शेतकर्यांंना साडेआठ लाख सोलर पंप देण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे, पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी चांगले नियोजन करून शासनाच्या योजनाची माहिती महिलांना व्हावी, यासाठी महिला संवाद मेळाव्याचे उत्तम असे आयोजन केले असल्याचे ते म्हणाले.
श्री पवार पुढे बोलतांना म्हणाले की, मुलींना 10 वी 12 वी पर्यंत मोफत शिक्षण मिळत आहे. आता मुलींना उच्च शिक्षण घेता यावे, यासाठी 100 टक्के रक्कम सरकार भरणार आहे. यासाठी 8 लाख वार्षिक उत्पन्न असणार्या कुटुंबातील मुलींना याचा लाभ होईल, या माध्यमातून मुली उच्चपदावर कार्य करतील, रस्ते, पाणी, आरोग्य या विका कामांबरोबरच महिलांनी महिलांसाठीच्या योजनेचा लाभ घ्यावा. आता पिंक रिक्षा योजनेसाठी राज्यात 17 शहरांची निवड केली असून यात अहमदनगर शहर आहे. येथील 300 महिलांना रिक्षा दिली जाणार आहे. मुलींसाठी लखपती योजना सुरु केली. मुलगी जन्मापासून तिच्या नावे पैसे टाकण्याचे काम सरकारकडून सुरु आहे. ती मुलगी 18 वर्षाची झाल्यानंतर 1 लाख 1 हजार रुपये मिळणार आहे. या सर्व योजना बजेटमध्ये तरतूद केल्या आहे. सरकार जनतेचे आहे. त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा. आणि महायुतीच्या उमेदवारांना निवडून द्यावे, असे आवाहन करत यावेळी सरकारच्या योजनांची दप्तरीच त्यांनी महिलांना सांगितली.
यावेळी विविध संघटनांच्यावतीने उपमुख्यमंत्री अजित पवार यांना विविध मागण्याबाबत निवेदन देत सत्कार केला.