संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : जालना जिल्ह्यातील सराटी येथील मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून करण्यात आलेल्या लाठीचार्जचे अहमदनगरमध्ये तीव्र पडसाद उमटले. मराठा विद्यार्थ्यांनी अन्नत्याग केला, तर सकल मराठा समाजाच्या वतीने दोषींवर कारवाई करण्याची मागणी निवेदनाद्वारे केली. तसेच शिवसैनिकांनी (ठाकरे सेना) काळ्या फिती लावून घटनेचा निषेध केला. इंडिया अहमदनगरच्या वतीने भगतसिंग यांच्या स्मारकासमोर सरकारविरोधात घोषणाबाजी करत निदर्शने करण्यात आली.
जालना जिल्ह्यातील सराटी गावात आरक्षणासह इतर मागण्यांसाठी मराठा समाजाच्या वतीने उपोषण करण्यात आले होते. उपोषणादरम्यान मराठा आंदोलकांवर पोलिसांकडून शुक्रवारी (दि. १) लाठीचार्ज करण्यात आला. या घटनेचे राज्यभर तीव्र पडसाद उमटले. अहमदनगर शहरासह जिल्ह्यात ठिकठिकाणी रस्ता रोको, निदर्शने करत सरकारचा निषेध करण्यात आला. नगर शहरात स्मायलिंग अस्मिता या विद्यार्थ्यांच्या संघटनेने शुक्रवारी रात्रीपासूनच नगरमधील छत्रपती चौथे शिवाजी महाराज यांच्या समाधी स्थळी धरणे धरत अन्नत्याग केला. दरम्यान, शनिवारी सकाळपासूनच शहरातील बंदोबस्त वाढविण्यात आला. मराठा समाजाने शांततेच्या मार्गाने आंदोलन करत जालना येथील घटनेचा निषेध केला असून, संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कडक कारवाई करण्याची मागणी केली.