संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
कर्जत :- लग्नात वटकण लावण्याच्या प्रथेतून मुलाकडच्या मंडळींचा तोरा पोलीस स्टेशनमार्गे काहीवेळात रेशीमगाठ मोडण्यापर्यंत पोहचल्याने याची जोरदार चर्चा होताना दिसत आहे.
विवाह म्हणजे दोन कुटुंबाचे दोन मनाचे मनोमिलन समजले जाते, साताजन्माच्या गाठी याच विधीत बांधल्या जातात पण आज काल या गाठी इतक्या सहजासहजी तोडल्या जातात की यावर चिंतन करण्याची खरी गरज आहे.
कर्जत तालुक्यातील नांदगाव येथे रविवारी (दि.२०) सिद्धटेकचा नवरदेव मुलगा हा नांदगाव येथील नवरी मुलीशी विवाहबद्ध झाला. लग्न समारंभ अत्यंत उत्साहात साजरा झाला. सर्व विधी पार पडल्यानंतर कन्येला सासरी पाठविण्या पूर्वी वधूवरांना जेवू घालण्याचा कार्यक्रम सुरु झाला. वराने जेवण सुरू करण्यासाठी रितीरिवाजा प्रमाणे वधूपक्षाकडून वराच्या ताटास २०० रुपये वटकण म्हणून लावण्यात आले. मात्र तेवढ्यावर वरपक्षाकडील लोकांचे समाधान झाले नाही. यांच्याकडून वाढीव पैशाची मागणी होवू लागली. वधूपक्षाने त्यास स्पष्ट नकार दिला. रुसवेफुगवे टोकाला गेले. हौसेने करावयाची ही प्रथा विवाहबद्ध झालेल्या वधू-वरांच्या रेशिमगाठी सोडण्यास कारणीभूत ठरवत वधुपित्याने मुलीची पाठवणीच न करण्याचा निर्णय घेतला. त्याच्या या निर्णयाने सर्वच जण हादरून गेले, ग्रामस्थांनी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला. बराच वेळ हा गोंधळ सुरूच राहिला. मात्र वधुपित्याने यात कोणाचे ही ऐकले नाही, आपल्या मुलीपेक्षा वर पक्षाला पैशाची अपेक्षा जास्त आहे अशा कुटुंबात आपली मुलगी पाठवायलाच नको अशा निर्णयासाठी अखेर वधुपित्याने थेट पोलीस स्टेशनच गाठले.
नांदगाव येथील कौटुंबिक स्नेहबंधातील हा पेच सोडवण्याचे काम कर्जतचे सहाय्यक पोलीस निरीक्षक सुरेश माने याचे वर आले यासाठी ते विवाहस्थळी पोहोचले. त्यांनी सर्व प्रकार समजून घेतला. वधूपित्याला समजावून सांगण्याचा प्रयत्न केला. मात्र ते निर्णयावर ठाम होते. विवाह झालेली नववधू सज्ञान असल्याने पोलीस अधिकारी माने यांनी शेवटी नववधूचा निर्णय विचारला. मात्र तिनेही आपल्या वडिलांच्या निर्णयाला पाठिंबा देत सासरला न जाण्याचा निर्णयजाहीर केले केला, या अनपेक्षित धक्यातून वर पक्षाकडील मंडळीला सावरण्यास संधीच मिळाली नाही व शेवटी लग्न होऊन ही नवरी विना नवरदेवाला आपल्या घरी परतावे लागले, लग्न सोहळ्यात वटकन वर पक्षाला खूपच महागात पडले व सर्वाना मुकाट्याने घर गाठावे लागले.
संकलन – आशिष बोरा