संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork (video)
अहमदनगर– महाराष्ट्र प्रदेश राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने दि.४ व दि.५ नोव्हेंबर २०२२ या दोन दिवशी शिर्डी येथे राज्यातील प्रमुख कार्यकर्त्यांसाठी ‘राष्ट्रवादी मंथन, वेध भविष्याचा’ या दोन दिवसीय अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे वर्तमान स्थितीसंदर्भातील आकलन वाढावे, भविष्यातील आव्हानांचा वेध घेण्यासाठी त्यांनी सज्ज व्हावे आणि राष्ट्र तसेच समाजाबद्दलची बांधिलकी भक्कम व्हावी, या उद्देशाने शिबिराचे आयोजन केले आहे, अशी माहिती राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र फाळके यांनी दिली.
राष्ट्रवादी कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या ‘राष्ट्रवादी मंथन : वेघ भविष्याचा’ या शिबिरामध्ये पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार, विधानसभेतील विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यासह पक्षाचे ज्येष्ठ नेते, राज्यातील विविध क्षेत्रातील विचारवंत, अभ्यासक मार्गदर्शन करणार आहेत. पक्षाच्या वतीने सभासद नोंदणी मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवण्यात येत आहे. ही मोहीम गतिमान करून ग्रामीण तसेच शहरी भागात कार्यकर्त्याचे मजबूत जाळे निर्माण करण्यात येत आहे. शिबिराच्या माध्यमातून या मोहिमेला चालना देण्यात येणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची स्थापना होऊन २३ वर्षे झाली असून येत्या जून महिन्यामध्ये पक्ष रौप्यमहोत्सवी वर्षात पदार्पण करेल. पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेल्या आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली वाटचाल करणा-या पक्षाने आपल्या २३ वर्षांच्या वाटचालीमध्ये महाराष्ट्रासाठी मोठे योगदान दिले आहे. छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी शाहू महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची विचारधारा प्रमाण मानून राष्ट्रवादी कॉंग्रेसची वाटचाल दमदारपणे सुरू राहिली आहे.
पक्षाच्या अंतर्गत काम करणा-या विविध संघटनांनी वेळोवेळी आपली भूमिका उत्तमपणे पार पाडली. त्याचमुळे महाराष्ट्रातील सुजाण आणि परिवर्तनशील जनतेने राष्ट्रवादी काँग्रेसला पाठबळ दिले. अलीकडच्या काळामध्ये भक्कम संघटनात्मक बांधणीसाठी प्रयत्न करणारा राष्ट्रवादी कॉंग्रेस हा एकमेव पक्ष आहे. प्रदेशाध्यक्ष मा.जयंत पाटील यांनी त्यासाठी चांदा ते बांदा पर्यंत परिवार संवाद यात्रा काढून तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत पक्षाचा विचार पोहोचवला. त्याचे परिणाम नंतरच्या काळात झालेल्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसून आले. नगरपंचायत निवडणुकीत राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्ष पहिल्या क्रमांकावर राहिला. अलीकडे ग्रामपंचायत निवडणुकीतही पक्षाने लक्षणीय यश मिळवले. जनतेच्या अशा पाठबळामुळेच आजवरच्या २३ वर्षाच्या प्रवासातील साडेसतरा वर्षे पक्ष राज्याच्या सत्तेमध्ये राहिला. पवार साहेबांनी सातत्याने केलेली विचारांची पेरणी आणि दुस-या फळीतील नेत्यांनी केलेली मशागत यामुळे प्रत्येक आघाडीवर पक्षाने अग्रभागी राहून आपली भूमिका बजावली. समविचारी पक्षांना सोबत घेऊन वैचारिक लढाई लढली. हीच परंपरा अधिक व्यापक आणि गतिमान करण्यासाठी शिर्डी येथे ‘राष्ट्रवादी मंथन: वेध भविष्याचा अभ्यास शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. आज देशापुढे आणि राज्यापुढे अनेक गंभीर प्रश्न उभे आहेत. २०२४च्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांना सामोरे जाताना कार्यकर्त्यांची मनोभूमिका अधिक बळकट होण्याची आवश्यकता आहे, यासाठी राष्ट्रवादी मंथनाचे आयोजन केलं आहे.
.