संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आदेशानुसार रशियन सैन्याने युक्रेनवर हल्ला केला आहे. युद्ध छेडल्यावर यूक्रेनसोबत अमेरिका आणि इतर नाटो देश असतील. तर रशियाच्या पाठीची चीन उभा राहिल हे तर पहिलेच स्पष्ट होते. आता चीन तैवानवर कब्जा करण्यासाठी युद्धाचा मार्ग अवलंबू शकतो, अशी भीती व्यक्त होत आहे.
रशिया-युक्रेन युद्धाच्या दरम्यान आता नजरा चीनच्या भूमिकेकडे वळल्या आहेत, कारण तो नेहमीच रशियाच्या बाजुने दिसला आहे. चीनलाही रशियासारखा नाटोचा विस्तार नको आहे. मात्र, रशिया-युक्रेन युद्धावर चीनने सुरक्षित भूमिका घेतली आहे.
एकीकडे अनेक देशांनी युक्रेनविरोधात रशियाच्या पावलांचा निषेध केला आहे, तर दुसरीकडे चीनने तटस्थ भूमिका घेतली होती. मात्र अमेरिकेने रशियावर निर्बंध लादल्यानंतर चीन उघडपणे रशियाच्या पाठीशी उभा राहिला आहे. चीनने अमेरिकेच्या या निर्णयाला विरोध करत याला आगीत तेल टाकण्याचे काम असल्याचे म्हटले आहे. निर्बंध कधीच समस्या सोडवत नाहीत, असे चीनने म्हटले आहे. चीन बेकायदेशीर आणि एकतर्फी निर्बंधांना सलग विरोध करत आहे. युक्रेन आणि रशियाशी संबंधित प्रश्न हाताळताना चीन आणि इतर देशांच्या हितसंबंधांना धक्का पोहोचू नये, असा इशारा चीनने अमेरिकेला दिला आहे.
याआधी संयुक्त राष्ट्र सुरक्षा परिषदेच्या बैठकीत चीनने सर्व पक्षांना संयम बाळगण्याचे आणि युक्रेन वादावर राजनैतिक तोडगा काढण्यासाठी सर्व प्रयत्नांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले होते. चीनने आपल्या वक्तव्यात रशियावर टीका केलेली नव्हती.
बीजिंग विंटर ऑलिम्पिकच्या उद्घाटन समारंभासाठी रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांनी 3 फेब्रुवारी रोजी चीनला भेट दिली होती. त्यानंतर दोन्ही देशांनी संयुक्त निवेदन जारी केले होते. याच निवेदनात चीन देखील नाटोच्या विस्तारावर आक्षेप घेतला होता. पाश्चात्य लोकशाहीचे जागतिक मॉडेल कमजोर करण्यासाठी चीन रशियासोबत एकत्र काम करू शकतो. त्यासाठी रशियाचे युक्रेनसोबतच्या युद्धाचे पाऊल उपयुक्त ठरेल.
चीन नेहमीच तैवानला आपला भाग असल्याचे सांगत आला आहे. रशियाने युक्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर आता चीनही तैवानमध्ये पुतीन यांचा मार्ग अवलंबू शकतो, असे मानले जात आहे. रशिया-युक्रेन युद्धाच्या पाश्चिमात्य भूमिकेवर चीन बारकाईने लक्ष ठेवून आहे. चीनचे म्हणणे आहे की भू-राजकीय चिंतेच्या संदर्भात युरोपीय देश आणि अमेरिकेची प्राथमिकता भिन्न आहे. चीनचे लक्ष्य आहे की, तैवानला त्यांच्या राजकीय मागण्यांपुढे झुकण्यास आणि चिनी कब्जा मान्य करण्यास भाग पाडणे.