संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
मुंबई- महाराष्ट्रात अखेर कोरोनाचा नवा विषाणू ओमायक्रॉन दाखल झाला आहे. दक्षिण आफ्रिकेतून दुबई, दिल्लीमार्गे मुंबईत आलेला हा ३३ वर्षीय तरुण डोंबिवलीचा रहिवासी आहे. त्याने कोरोनाची कोणतीही लस घेतलेली नसून कोरोनाच्या नव्या विषाणूचा संसर्ग झालेला राज्यातील हा पहिलाच रुग्ण आहे. सुदैवाने गेल्या ११ दिवसांमध्ये त्यांच्या संपर्कात आलेल्या एकूण ६० जणांचा अहवाल कोरोना निगेटिव्ह आला आहे. दरम्यान, कल्याण-डोंबिवलीत सापडलेला रुग्ण हा ओमायक्रॉनची बाधा झालेला देशातील चौथा रुग्ण ठरला आहे. २४ नोव्हेंबर रोजी या प्रवाशाला सौम्य ताप आला तथापि इतर कोणतीही लक्षणे आढळली नाहीत. तो सध्या कल्याण-डोंबिवली येथील कोविड केअर सेंटरमध्ये उपचार घेत आहे. या रुग्णाच्या १२ अति जोखमीच्या निकट सहवासितांचा आणि २३ कमी जोखमीच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात आला असून हे सर्वजण कोविड निगेटिव्ह आढळले आहेत. याशिवाय या तरुणाने दिल्ली ते मुंबई हा प्रवास ज्या विमानाने केला त्या विमान प्रवासातील २५ सहप्रवाशांचीदेखील तपासणी करण्यात आली असून सर्व मिळून एकूण ६० कोविड निगेटिव्ह आढळलेले आहेत.
अति जोखमीच्या झिम्बाव्वे येथून ७२ वर्षीय वृद्ध २८ नोव्हेंबर रोजी जामनगरला येथे आला होता. २ डिसेंबर रोजी त्याचा पॉझिटिव्ह अहवाल आला. त्याने झिम्बाब्वे येथे चिनी लस ‘सीनोव्हॅक्स’चे दोन डोस घेतले होते, तर त्याच्या संपर्कात आलेल्या १० जणांनी भारतीय लस घेतली असून त्यांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत.
कर्नाटकात आढळलेल्या ४६ वर्षीय ओमायक्रॉन बाधित रुग्णामध्ये कोरोनाची कोणतीही लक्षणे नाहीत. तो ठणठणीत असून बॅडमिंटनही खेळतो, असे रुग्णालयातील अॅनेस्थेयोलॉजिस्टने व्हिडिओ कॉलवर प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले.
विमानतळावर ८ बाधित आढळले : मुंबई विमानतळावरील तपासणीत १ डिसेंबरपासून आतापर्यंत ८ प्रवासी कोविडबाधित आढळले असून त्यांचे नमुने जनुकीय तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.
झांबिया देशातून पुणे येथे आलेल्या ६० वर्षीय पुरुषाच्या जनुकीय तपासणीचा अहवालही राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेकडून प्राप्त झाला असून या रुग्णामध्ये ओमायक्रॉन आढळलेला नाही. तथापि डेल्टा सबलिनिएज विषाणू आढळून आलेला आहे.
मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर अति जोखमीच्या देशातून आलेले सर्व ३,८३९ तर इतर देशांमधून आलेल्या १७,१०७ पैकी ३४४ प्रवाशी अशी एकूण ४,१८३ प्रवाशांची आरटीपीसीआर तपासणी करण्यात आली आहे.