महाराष्ट्राचे नवीन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्रीपदी एकनाथ शिंदे, अजित पवार
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
मुंबई : महाराष्ट्रामध्ये महायुती सरकारचा मोठ्या उत्साहात शाही शपथविधी सोहळा मुंबईतील आझाद मैदानात पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली. महाराष्ट्राचे राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी त्यांना पद आणि गोपनीयतेची शपथ दिली. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांच्यासह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्कर सिंह धामी ते बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांच्यासह विविध राज्यांचे मुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत शपथविधी सोहळा पार पडला.
या शाही शपथविधी सोहळ्याला सिनेसृष्टीमधील दिग्गजांनी देखील हजेरी लावली होती. त्यामुळे या ठिकाणी सिनेतारकांची मांदियाळी पाहायला मिळाली. तसेच, या सोहळ्यामध्ये महायुतीचे राज्यभरातील समर्थक, कार्यकर्ते उपस्थित होते. तर देवाभाऊ (मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस), एकनाथभाई (उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे) आणि अजितदादा (उपमुख्यमंत्री अजित पवार) असे लाडक्या बहिणींच्या भावांचे सरकार स्थापन झाले आहे. देवेंद्र फडणवीसांनी तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. महत्त्वाची बाब म्हणजे उपमुख्यमंत्रिपदावरून मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणारे ते पहिलेच व्यक्ती ठरले आहे. तर अडीच वर्ष मुख्यमंत्रिपद भूषविलेल्या एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. तसेच, अजित पवारांनी सहाव्यांदा उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेत विक्रम केला आहे.
महाराष्ट्राच्या विधानसभा निवडणुकीत महायुतीने 288 पैकी 230 जागांवर विजय मिळवला. भाजपला 132, शिवसेनेला 57 आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला 41 जागा मिळाल्या. तर इतर अपक्षांच्या मदतीने त्यांचा आकडा 236 झाला आहे. त्यामुळे सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपाच्या देवेंद्र फडणवीसांना तिसऱ्यांदा मुख्यमंत्री होण्याचा बहुमान मिळाला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी 2014-2019 या कालावधीत त्यांनी पहिल्यांदा राज्याचं मुख्यमंत्रिपद भूषवलं. 2019 मध्ये भाजपा आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या सरकारचे ते 72 तासांसाठी मुख्यमंत्री होते. त्यानंतर आज ते तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत.
तर, नाराजीनाट्याला पूर्णविराम लगावत एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री बनले आहेत. शपथविधी सोहळ्याच्या तीन तास आधीपर्यंत शिंदे सरकारमध्ये सहभागी होणार की नाही याबाबतच्या चर्चा सुरू होत्या. पण अखेरीस त्यांनी या चर्चांवर पडदा टाकत शपथ घेतली. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार यांनी सहाव्यांदा शपथ घेतली. 2019-2024 या कालावधीतील तीन राज्य सरकारांमध्ये अजित पवार राज्याचे उपमुख्यमंत्री होते. अजित पवार 2010 मध्ये पहिल्यांदा उपमुख्यमंत्री झाले होते. आज त्यांनी देवेंद्र फडणवीस यांच्या सरकारमध्ये दुसऱ्यांदा उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेतली.