मराठी पत्रकार परिषदेतर्फे ७ एप्रिलला कर्जतला पत्रकारांचा राज्यस्तरीय मेळावा

ज्येष्ठ कार्यकारी संपादक संजय राऊत प्रमुख पाहुणे, आमदार रोहित पवार स्वागताध्यक्ष
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :
अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषदेतर्फे राज्यातील तालुका पत्रकार संघांचा राज्यस्तरीय मेळावा आणि आदर्श तालुका व जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार वितरण सोहळा ७ एप्रिल २०२३ रोजी अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत येथे होत आहे. या मेळाव्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून दैनिक सामनाचे कार्यकारी संपादक खासदार संजय राऊत उपस्थित राहणार आहेत. कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार या मेळाव्याचे स्वागताध्यक्ष आहेत, अशी माहिती मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस.एम. देशमुख यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी परिषदेचे अध्यक्ष शरद पाबळे व सरचिटणीस मन्सूरभाई शेख, अहमदनगर प्रेस क्लबचे अध्यक्ष विठ्ठल लांडगे, विजयसिंह होलम, सुर्यकांत नेटके उपस्थित होते.
यासंबंधी अधिक माहिती देताना देशमुख यांनी सांगितले की, मराठी पत्रकार परिषदेचा राज्यातील तालुका पत्रकार संघाचा राज्यस्तरीय मेळावा कर्जत येथील दादा पाटील महाविद्यालयाच्या नव्याने बांधण्यात आलेल्या अद्ययावत शारदाबाई पवार सभागृहात होणार आहे. मेळाव्यासाठी राज्यभरातील सर्व तालुक्यांतील मिळून सुमारे पाचशे पत्रकार उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याची कर्जत-जामखेडमधील नियोजन समितीच्या वतीने जोरदार तयारी करण्यात येत आहे. या मेळाव्यामध्ये मराठी पत्रकार परिषदेच्यावतीने दरवर्षी सर्वोत्कृष्ट काम करणाऱ्या तालुका आणि जिल्हा संघांना वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार संघ आणि रंगा आण्णा वैद्य आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे. यंदाचा आदर्श जिल्हा पत्रकार संघ पुरस्कार रत्नागिरी जिल्हा पत्रकार संघाला जाहीर करण्यात आला आहे.
कर्जतमधील पत्रकार गणेश जेवरे, आशिष बोरा, योगेश गांगर्डे, भाऊसाहेब तोरडमल, मच्छिंद्र अनारसे, मोतीराम शिंदे, अस्लम पठाण, जामखेडचे पत्रकार अविनाश बोधले,सुदाम वराट, अशोक वीर, किरण रेडे, पप्पूभई सय्यद यांच्यासह सर्व स्थानिक पत्रकार तसेच जिल्ह्यातील पदाधिकारी यासाठी परिश्रम घेत आहेत.
या मेळाव्याला तालुका, जिल्हाध्यक्ष तसेच अन्य पदाधिकाऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस. एम. देशमुख, विश्वस्त किरण नाईक, अध्यक्ष शरद पाबळे, कार्याध्यक्ष मिलिंद अष्टीवकर, सरचिटणीस मन्सुरभाई शेख, नाशिक विभागीय सचिव रोहिदास हाके, नगर दक्षिण जिल्हाध्यक्ष सूर्यकांत नेटके, उत्तर नगर जिल्हाध्यक्ष अमोल वैदय यांच्यासह संघटनेच्या राज्य आणि जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांनी केले आहे. पत्रकार परिषदला ज्येष्ठ संपादक सुभाष गुंदेचा, मन्सूरभाई शेख आदिंसह उपस्थित होते.
यंदाचे पुरस्काराचे मानकरी तालुके पुढील प्रमाणे
नागपूर विभाग : मोहाडी तालुका पत्रकार संघ जिल्हा भंडारा अमरावती विभाग : धामणगाव तालुका पत्रकार संघ, जिल्हा अमरावती लातूर विभाग : औंढा नागनाथ तालुका पत्रकार संघ जिल्हा हिंगोली नाशिक विभाग : अमळनेर तालुका पत्रकार संघ, जिल्हा जळगाव पुणे विभाग : पुरंदर तालुका पत्रकार संघ जिल्हा पुणे कोल्हापूर विभाग : जत तालुका पत्रकार संघ, जिल्हा सांगली औरंगाबाद विभाग : पैठण तालुका पत्रकार संघ, जिल्हा औरंगाबाद कोकण विभाग : महाड तालुका मराठी पत्रकार संघ जिल्हा रायगड

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!