संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
Mumbai – तृणमूल काँग्रेसच्या (TMC) प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी मोदी सरकारला घेरण्याच्या, २०२४ च्या सार्वत्रिक निवडणुका जिंकण्याच्या रणनीतीचा एक भाग म्हणून दिल्लीनंतर मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यादरम्यान राष्ट्रगीताचा अवमान केल्याप्रकरणी त्यांच्याविरोधात मुंबईत तक्रार दाखल करण्यात आली आहे. मुंबईतील भाजपच्या एका नेत्याने ममता बॅनर्जींविरोधात पोलिसात तक्रार दाखल केली आहे.
पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याविरोधात मुंबईतील भाजप नेत्याने पोलिसांत दाखल केलेल्या तक्रारीत म्हटले आहे की, “पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री बॅनर्जी यांनी बुधवारी बसून राष्ट्रगीत गात होत्या, तसंच त्यांनी अर्धच राष्ट्रगीत गायलं. त्यांनी राष्ट्रगीताचा पूर्णपणे अनादर केला आहे.”
ममता बॅनर्जी सध्या मुंबईच्या दौऱ्यावर आहेत. यावेळी त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. पवार यांच्या भेटीत त्यांचे पुतणे अभिषेक बॅनर्जी आणि राष्ट्रवादीचे नेते प्रफुल्ल पटेल हेही उपस्थित होते. या धोरणात्मक बैठकीनंतर ममता बॅनर्जी आणि शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेलाही संबोधित केले.
केंद्रातील सत्ताधारी भाजपच्या विरोधात एकजूट असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत सांगितले. ते म्हणाले की, जे भाजपच्या विरोधात आहेत, ते आमच्यासोबत आले तर आम्ही त्यांचे स्वागत करू, हे स्पष्ट आहे. पश्चिम बंगाल आणि महाराष्ट्र यांचे जुने नाते आहे. दोन्ही राज्यांमध्ये अनेक समानता आहेत. आज ममता बॅनर्जी यांनीही माझ्याशी देशाच्या राजकीय प्रश्नांवर चर्चा केली.
त्याचवेळी, या संयुक्त पत्रकार परिषदेत ममता बॅनर्जी म्हणाल्या की, देशात फॅसिझम सुरू आहे. त्यामुळे पर्यायी व्यवस्था उभी करायला हवी. काँग्रेसवर अप्रत्यक्ष हल्ला चढवताना ममता बॅनर्जी म्हणाल्या की, कोणी लढत नाही तर काय करायचे. पर्यायी आघाडीची चर्चा व्हायला हवी, असे त्या म्हणाले. याशिवाय त्यांनी काय आहे यूपीए? सध्या यूपीए अस्तित्त्वात नाही, असे देखील ममता बॅनर्जी म्हणाल्या.