संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :- मध्यस्थी प्रक्रियेमध्ये मध्यस्थ याची फार महत्त्वाची भूमिका असते. मध्यस्थी प्रक्रियेमध्ये वेगवेगळ्या प्रकारे बैठका घेतल्या जातात. त्यामध्ये दोन्ही पक्षांसोबत संयुक्त बैठका पार पाडल्या जातात व नंतर प्रत्येक पक्षासोबत वैयक्तिक बैठका घेतल्या जातात. त्यामध्ये कोणालाही साक्षीदार म्हणून बोलावण्यात येत नाही. सर्व प्रक्रिया ही गोपनीय असते. अतिशय कमी कालावधीत ही प्रक्रिया पार पाडली जाते. न्यायालयात खटले चालवताना जो वेळ वाया जातो तो वेळ मध्यस्थी प्रक्रियेमध्ये वाचतो. त्यामुळे मध्यस्थी प्रक्रिया हा प्रकरणाचा निकाल लागण्यासाठी चांगला पर्याय असू शकतो ,असे मत जिल्हा व सत्र न्यायाधीश तथा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण अध्यक्ष सुधाकर यार्लगड्डा यांनी व्यक्त केले.
मुख्य मध्यस्थी केंद्र, मुंबई यांच्या निर्देशानुसार जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर बार असोसिएशन अहमदनगर व सेंट्रल बार असोसिएशन अहमदनगर यांच्या संयुक्त विद्यमाने मध्यस्थी प्रक्रियाबाबत जागरूकता कार्यक्रमाचे नुकतेच आयोजन करण्यात आले होते.
या कार्यक्रमाची प्रस्तावना श्रीमती. भाग्यश्री का. पाटील सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांनी केली. त्यांनी महिला विधिज्ञांच्या नाट्यसंघाने मध्यस्थी प्रक्रियेवरील जे नाट्य सादरीकरण केले, त्याबद्दल माहिती दिली व त्यांचे विशेष आभार मानले.
या कार्यक्रमात महिला विधिज्ञांच्या नाट्यसंघाने मध्यस्थी प्रक्रियेवरील नाट्य सादरीकरण केले त्यामध्ये त्यांनी रोजच्या जीवनातील विविध घटना व मध्यस्थी प्रक्रिया ही नाट्य सादरीकरणातून सर्वांना समजावण्याचा यशस्वी प्रयत्न केला. सादरीकरणामध्ये ॲड. स्वाती वाघ पाटील, ॲड अनिता दिघे पाटील, ॲड मनीषा केळगंद्रे, ॲड शर्मिला गायकवाड, ॲड ज्योती हिंगणे, ॲड.अंजली केवल, ॲड अनुराधा येवले, ॲड. वैभव बागुल यांनी भाग घेतला.
कार्यक्रमास मुख्यालयातील सर्व न्यायिक अधिकारी, अहमदनगर बार असोसिएशनचे अध्यक्ष, ॲड संजय पाटील, सेंट्रल बार असोसिएशनचे अध्यक्ष ॲड के. एम. देशपांडे, जिल्हा सरकारी वकील ॲड एस. के. पाटील, ॲड अनिल सरोदे, मुख्य, कायदेविषयक बचाव पक्ष विधी सहाय्य सल्लागार व त्यांचे सहकारी, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सदस्य ॲड भूषण बराटे, ॲड सुनील मुंदडा, ॲड अभय राजे, दोन्हीबारचे सदस्य, जिल्हा न्यायालयाचे कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन ॲड श्रीमती स्वाती नगरकर, सदस्य , जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, अहमदनगर यांनी केले. आभार पॅनल विधीज्ञ, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण ॲड श्रीमती. अनुराधा येवले यांनी केले.