डेल्टा प्लस व्हेरियंट धोकादायक
देशात कोरोना संक्रमणाच्या दुसरी लाट ओसरताना दिसत असतानाच कोरोना विषाणूच्या ‘डेल्टा प्लस व्हेरिएंट’ने थैमान घातले आहे. देशात आतापर्यंत कोरोना व्हायरसच्या डेल्टा प्लस व्हेरियंटचे ४० हून अधिक रुग्ण सापडले आहेत. कोरोना विषाणूच्या या बदललेल्या स्वरुपामुळे देशाला कोरोना संक्रमणाच्या तिसऱ्या लाटेला सामोरे जाण्याची शक्यता देखील वर्तवण्यात येत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, ‘डेल्टा प्लस व्हेरिएंटने पहिला बळी घेतला आहे. डेल्टा प्लस कोरोनाची लागण झालेल्या एका महिला रुग्णाचा मृत्यू झाल्याने देशाची चिंता अधिक वाढली आहे.
मध्य प्रदेशमध्ये डेल्टा प्लस व्हेरिएंटमुळे एका महिला रुग्णाचा मृत्यू झाला आहे. मध्य प्रदेशातील उज्जैनमधील महिलेचा डेल्टा प्लस कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. दैनिक भास्करने दिलेल्या बातमीनुसार, या महिलेने कोरोना लस घेतली नव्हती. तर कोरोना लस घेतलेल्या तिचा नवऱ्याची प्रकृती पूर्णपणे ठीक आहे. या बदललेल्या स्वरुपाची सर्वाधिक प्रकरणं महाराष्ट्रातून समोर आली आहेत. त्यानंतर केरळ, मध्य प्रदेश या राज्यात सर्वाधिक डेल्टा प्लस व्हेरिएंटचे रुग्ण आढळले आहेत.
आतापर्यंत महाराष्ट्रात सर्वाधिक २१, मध्य प्रदेश ६, केरळ ३, रुग्ण आढळून आले आहेत. याव्यतिरिक्त तामिळनाडूमध्ये ३ तर पंजाब, आंध्र प्रदेश, जम्मू काश्मीर या राज्यांत प्रत्येकी एका रुग्णाची नोंद करण्यात आली आहे. यानंतर केंद्र सरकारने केरळ, महाराष्ट्र आणि मध्य प्रदेश या तिन्ही राज्यांना केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं योग्य आरोग्यविषयक उपाययोजना करण्याचा सल्ला दिला आहे. दरम्यान, मंगळवारी सायंकाळी आरोग्य मंत्रालयाने पत्रकार परिषदेत अधिकाऱ्यांनी डेल्टा प्लस व्हेरियंटची माहिती दिली होती. या दरम्यान, डेल्टा प्लस व्हेरिएंट भारतासह ९ देशांत आढळून आल्याचे आरोग्य सचिव राजेश भूषण यांनी सांगितले. यामध्ये भारत, यूके, यूएस, जपान, रशिया, पोर्तुगाल, स्वित्झर्लंड, नेपाळ आणि चीन या देशांचा समावेश आहे.
डेल्टा प्लस व्हेरियंट ७ जिल्ह्यांत पसरला असून आतापर्यंत २१ रुग्णांची नोंद झाली आहे. हा व्हेरियंट काळजीपुर्वक नसला तरी त्याचे गुणधर्म धोकादायक आहेत. केंद्र सरकारकडून आलेल्या सुचनेत या व्हेरियंटचा संसर्ग हा वेगवान असल्याचे सांगण्यात आलं आहे. याची लागण झाली तर याचा परीणाम जास्त आहे. व्यक्तीमध्ये ज्या प्रतिकारशक्ती तयार झाल्या आहेत या प्रतिकारशक्तीचा परीणाम होऊ न देण्याची ताकद या डेल्टा प्लसच्या व्हेरियंटमध्ये आहे.