संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
‘मधल्या काळात खूप राजकारण झालं. मधल्या काळात सत्तांतर झालं त्यावेळी पासून तालुक्यावर सूड उगवला जात आहे. कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे’, अशा शब्दांत बाळासाहेब थोरात यांनी विधान परिषदेच्या निवडणुकीनंतर आपली प्रतिक्रिया दिली.
नाशिक पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीत काँग्रेसचे बंडखोर नेते सत्यजीत तांबे यांनी विजय मिळवला. या निवडणुकीपूर्वी काँग्रेसने तांबे पिता-पुत्रांवर कारवाई करत त्यांना पक्षातून निलंबित केले होते. त्यानंतर सत्यजीत तांबेंनी ही निवडणूक अपक्ष म्हणून लढवली होती. विशेष म्हणजे ही निवडणूक जिंकल्यानंतर विजय साजरा करताना सत्यजीत तांबे हे काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात यांच्या गाडीत दिसले होते. त्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले होते. तसेच, बाळासाहेब थोरात हे भाजपामध्ये प्रवेश करणार अशा चर्चाही रंगल्या होत्या. परंतु, आज बाळासाहेब थोरात यांनी एका व्हिडीओच्या माध्यमातून या सर्वचर्चांना पूर्णविराम दिला.
“मधल्या काळात खूप राजकारण झालं. मधल्या काळात सत्तांतर झालं त्यावेळी पासून तालुक्यावर सूड उगवला जात आहे. कार्यकर्त्यांना त्रास दिला जात आहे. चांगले चालू असणारे उद्योग व्यवसाय बंद पाडले जात आहेत. आपण संघर्षातून मोठे झालो आहोत. या संघर्षातून आपण बाहेर येऊ आणि आणखी नव्या उमेदीने उभं राहू. त्याचबरोबर आता विधान परिषदेच्या निवडणुकीत मोठं राजकारण झालं तरीदेखील सत्यजित मोठ्या मताने विजयी झाला. राजकारण झालं ते मला व्यथित करणारे आहे. ही वस्तुस्थिती आहे. या बाबतीतील माझ्या भावना मी पक्षश्रेष्ठींना कळवल्या आहेत. हे पक्षीय राजकारण आहे. याबद्दल बाहेर बोललं पाहिजे असं नाही या मताचा मी आहे. म्हणून याबाबत मी पक्षश्रेष्ठींना कळवलं आहे. याबतीत पक्ष आणि मी मिळून योग्य त्या प्रकारे निर्णय घेऊ. बाकी लोकांनी याबाबत विचार करण्याची गरज नाही”, असे बाळासाहेब थोरात यांनी सांगितले.
“विधानपरिषदेच राजकारण सुरू असताना अनेक बातम्या आल्या. भारतीय जनता पक्षपर्यंत आपल्याला पोहचवल. इतकच नाही तर भाजपच्या तिकिटाचे वाटपही त्यांनी केले आहे. काही लोक कशा पद्धतीने गैरसमज पसरवण्याचा प्रयत्न करतात. काही लोक ही काम मुद्दाम करतात. अशा पद्धतीच्या चर्चा ते घडवून आणतात. तरीदेखील काँग्रेसचा विचार हा आपला विचार आहे आणि त्याच विचारान आम्ही पुढे देखील चालू. आतापर्यंत याच विचाराने जात आहोत. पुढे देखील याच विचाराने चालू”, असेही बाळासाहेब थोरात यांनी म्हटले.