मतदान प्रक्रियेवर ‘तिसऱ्या डोळ्याची’ नजर असणार
जिल्हा नियंत्रण कक्षाद्वारे वेबकास्टिंगच्या माध्यमातून मतदान प्रक्रियेचे होणार अवलोकन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहिल्यानगर – विधानसभा सार्वत्रिक निवडणूक २०२४ साठी जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघात बुधवार दि. २० नोव्हेंबर रोजी मतदानाची प्रक्रिया पार पडत आहे. मतदान प्रक्रियेदरम्यान होणाऱ्या प्रत्येक हालचालीवर जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन करण्यात आलेल्या नियंत्रण कक्षातून बारीक नजर ठेवण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी सिद्धाराम सालीमठ या यंत्रणेद्वारे स्वत: नियंत्रण कक्षातून मतदान प्रक्रियेवर लक्ष ठेवणार आहेत.
अहिल्यानगर जिल्ह्यातील १२ विधानसभा मतदारसंघातील ३ हजार ७६५ मतदान केंद्रातून मतदानाची प्रक्रिया पार पडणार आहे. या मतदान केंद्रापैकी ५० टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टींग करण्याच्या निवडणूक आयोगाने सूचना दिल्या आहेत. शहरी भागातील सर्व मतदान केंद्रातून मतदान प्रक्रियेचे वेबकास्टिंग करण्यात येणार आहे. त्यानुसार २ हजार ८५ मतदान केंद्रांवर ही सुविधा करण्यात आली आहे.
मतदान केंद्रांवर लावलेल्या कॅमेऱ्याद्वारे तेथील प्रत्येक हालचाली टिपल्या जातील. जिल्हाधिकारी कार्यालयात स्थापन नियंत्रण कक्षात प्रत्येक मतदार संघासाठी एक अशा एकूण १२ स्क्रीन लावण्यात आल्या असून या ठिकाणी स्वतंत्र पथक नियुक्त करण्यात आले आहे. या स्क्रीनवर २ हजार ८५ मतदान केंद्रांपैकी कोणत्याही केंद्रावरील मतदान प्रक्रिया पाहाता येईल.
वेबकास्टिंग यंत्रणेमुळे मतदान केंद्रावर निवडणूक आयोगाच्या सुचनेनुसार मतदान व्हावे यादृष्टीने चांगले नियंत्रण ठेवता येईल. तसेच मतदान प्रक्रियेदरम्यान तांत्रिक अडचणी आल्यास त्वरीत जिल्हा नियंत्रण कक्षाद्वारे संपर्क साधता येणार आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीतपणे आणि शांततेत पार पाडण्यासाठी ही यंत्रणा उपयुक्त ठरणार आहे. वेबकास्टिंगमुळे मतदान प्रक्रियेत कुठलाही गैरप्रकार होऊ नये यादृष्टीने चांगले नियंत्रण स्थापित करता येणार आहे.