भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत काऱ्हाटी ग्रामपंचायत राज्यात पहिली

भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेत काऱ्हाटी ग्रामपंचायत राज्यात पहिली
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
पुणे : भूजल समृद्ध ग्राम स्पर्धा २०२२-२३ चे निकाल जाहीर झाले असून राज्यातून प्रथम क्रमांकाचा १ कोटी रुपये आणि जिल्हास्तरीय प्रथम क्रमांकाचा ५० लाख रुपये असे दोन्ही पुरस्कार बारामती तालुक्यातील काऱ्हाटी ग्रामपंचायतीला जाहीर करण्यात आले आहेत.अटल भूजल योजना, भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्यावतीने या स्पर्धेचे आयोजन करण्यात येते. पुणे जिल्हा प्रशासन आणि संबंधित तालुक्यांच्या प्रशासनाने केलेल्या कामाची दखल राज्यपातळीवर घेण्यात आली आहे.

भूजलाच्या अनियंत्रित उपशामुळे भूजल पातळीत होत असलेली घसरण व बाधित होत असलेली गुणवत्ता थांबवण्याकरीता मागणी व पुरवठा व्यवस्थापन प्रणालीच्या प्रभावी अमंलबजावणीद्वारे सहभागीय भूजल व्यवस्थापन अधिकाधिक सशक्त करण्यासाठी केंद्र शासन व जागतिक बॅंक अर्थसहाय्यित अटल भूजल योजना राबविण्यात येत आहे. लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन करणे हा योजनेचा गाभा आहे. त्याकरीता ग्रामस्तरावर जलअंदाजपत्रक तयार करणे, भूजल उपलब्धतेतील तूट भरुन काढण्यासाठी अस्तित्वातील राज्य व केंद्र पुरस्कृत योजनांचे अधिकाधिक अभिसरण करणे व ग्रामस्तरावरील भूजल उपलब्धतेत शाश्वतता साध्य करणे, हे योजनेचे उद्दिष्ट आहे.

अटल भूजल योजनेच्या अंमलबजावणीमध्ये योजनेत समाविष्ट ग्रामपंचायतीमधील अधिकाधिक लोकांनी सहभागी व्हावे; सर्वांनी गावातील भूजल व्यवस्था शाश्वत राखण्याकरीता मोठ्या प्रमाणात सहभाग नोंदवावा हे योजनेचे मुख्य उद्दिष्ट आहे. त्यादृष्टीने गावा-गावांमध्ये सुदृढ स्पर्धा निर्माण व्हावी व योजनेचे मुख्य उद्दीष्ट ‘लोकसहभागातून भूजल व्यवस्थापन’ साध्य होण्यासाठी अटल भूजल योजनेंतर्गत भूजल समृद्ध ग्राम स्पर्धेचे आयोजन करण्यात आलेले होते.

उपविभागीय अधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली उपविभागीय समिती, जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती आणि राज्यस्तरावर पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग प्रधान सचिव यांच्या अध्यक्षतेखाली स्पर्धेचे मूल्यांकन करण्यात आले आहे.जिल्हास्तरीय पुरस्कारांतर्गत काऱ्हाटी ग्रामपंचायतीला प्रथम, पुरंदर तालुक्यातील सोनोरी ग्रामपंचायतीला ३० लाख रुपयांचा द्वितीय आणि चांबळी ग्रामपंचायतीला २० लाख रुपयांचा तृतीय क्रमांकाचा पुरस्कार झाला झाला आहे.पाणीपुरवठा व स्वच्छता विभाग मंत्री गुलाबराव पाटील यांच्या हस्ते ९ सप्टेंबर २०२४ रोजी सर मोक्षगुंडम विश्वेश्वरैय्या सभागृह, महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था नाशिक येथे पारितोषिक वितरण होणार आहे, अशी माहिती अटल भूजल योजना,भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणेचे सह संचालक तथा प्रकल्प समन्वयक डॉ. प्रवीण कथने यांनी दिली आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,200SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!