संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या सार्वजनिक निवडणुकीची अधिसूचना मंगळवारी (दि.२८) जारी झाली आहे. या निवडणुकीत ७ प्रभागातून ७ सदस्यांची भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डावर निवड होणार आहे. यासाठी रविवार (दि. ३० एप्रिल) मतदान होईल. तर २ मे ला मतमोजणी होणार आहे. अधिसूचना जारी होताच भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्ड हद्दीत निवडणूक आचारसंहिता लागू झाली आहे. भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाचे अध्यक्ष ब्रि. रसल डिसुजा यांनी मंगळवारी (दि.२८) निवडणूक अधिसूचना जारी केल्यानंतर राजकीय पक्षांनीही निवडणुकीची तयारी सुरू केली आहे.
छावणी परिषदेच्या ७ जागांसाठी होत आहे. या निवडणुकीसाठी २१ ते २२ मार्च या दरम्यान उमेदवारी अर्जाची विक्री होईल. दि.२३ मार्चला उमेदवारी अर्ज दाखल करता येणार आहेत. दाखल उमेदवारी अर्जांची यादी दि.२३ मार्चला प्रसिध्द केली जाणार आहे. दि.२७ मार्च पर्यंत अर्जावर हरकती नोंदविता येणार आहेत. दि.२९ मार्चला उमेदवारी अर्ज मागे घेता येणार आहेत. ज्या अर्जावर हरकती आल्या. मात्र त्यावरील निर्णय प्रलंबित आहे, अशा उमेदवारांसाठी दि.३१ मार्चला अर्ज माघारीसाठी मुदत देण्यात आली आहे. दि.६ एप्रिलला निवडणूक चिन्हांसह उमेदवारांची यादी प्रसिध्द होणार आहे. यानंतर दि.३० एप्रिलला मतदान आणि दि.२ मे रोजी मत मोजणी होणार आहे.
भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या ७ प्रभागांपैकी प्रभाग ७ हा अनु. जातीसाठी राखीव असून प्रभाग ४ आणि ६ हे महिलांसाठी राखीव आहेत. या निवडणूक कार्यक्रमाबरोबरच पुरवणी मतदार यादीचाही कार्यक्रम जाहीर करण्यात आला आहे. यानुसार प्रारूप पुरवणी मतदार यादीत नाव समाविष्ट करण्यासाठी दि.२८ फेब्रुवारी ते दि.२ मार्च या कालावधीत प्रपत्र ३ वितरीत करण्यात येणार आहे. प्रपत्र ३ सादर करण्याची अंतिम मुदत दि.३ मार्च आहे. प्रपत्र ३ प्रमाणे दि.२ मार्चला पुरवणी मतदार यादी प्रसिध्द होणार आहे. प्रारूप पुरवणी यादीवर हरकती घेण्याची अंतिम मुदत दि.८ मार्च आहे. प्राप्त हरकतींवर दि.१३ मार्चला सुनावणी होणार आहे. भिंगार कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या अध्यक्षांकडे दि.१५ मार्चपर्यंत अपील करता येणार आहे. दाखल अपिलावर सुनावणी होऊन दि.१७ मार्च रोजी अंतिम पुरवणी यादी प्रसिध्द करण्यात येणार आहे.