संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
बेलापूर- श्रीरामपूर तालुक्यातील बेलापूर बु ग्रामपंचायत निवडणुकीत अनुसुचित जमाती महिला या जागेवर निवडून आलेल्या सुनिता राजेंद्र बर्डे यांचे जात प्रमाणपत्रच रद्द झाल्यामुळे त्यांचे ग्रामपंचायत सदस्यत्व रद्द ठरविल्याचा आदेश जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले यांनी काढला आहे. या निकालामुळे जनता विकास आघाडीला धक्का बसला आहे.
बेलापूर ग्रामपंचायतीची निवडणूक सन २०२१ मध्ये झाली होती. त्यात प्रभाग क्रमांक चार मधून अनुसुचित जमाती महिला जागेकरीता गावकरी मंडळाच्या वतीने सौ.कमल भगवान मोरे तर जनता विकास आघाडीच्या वतीने सौ.सुनिता राजेंद्र बर्डे यांनी निवडणूक लढविली होती. या निवडणूकीत सौ कमल भगवान मोरे यांचा पराभव झाला. या निवडणुकीत जनता विकास अघाडीला सहा जागा तर गावकरी मंडळाला ११ जागा मिळाल्या होत्या. यावेळी सौ कमल मोरे यांनी जात पडताळणी कार्यालय नाशिक येथे अर्ज करुन बर्डे यांचे जात प्रमाणपत्र बोगस असल्यामुळे जात पडताळणी देऊ नये, अशी मागणी केली होती. सौ.मोरे यांच्या अर्जाची दखल घेऊन तो अर्ज चौकशी कामी उपविभागीय कार्यालय श्रीरामपूर येथे पडताळणीसाठी पाठविण्यात आला.श्रीरामपूर येथील उपविभागीय अधिकारी यांना जातीच्या दाखल्या सोबत जोडलेले पुरावे चुकीचे असल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे उपविभागीय कार्यालयाने सौ. सुनिता बर्डे यांचे जात प्रमाणपत्र दि.१० ऑक्टोबर २०२२ रोजी रद्द केले व तसा चौकशी अहवाल जातपडताळणी कार्यालयास कळविला. राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्र आदेश क्र/रानिआ/मनपा/२००७ / प्रक्र६ /क-५ दि. ३ ऑक्टोंबर २००७ मधील मुद्दा क्रमांक ३ नगरपरिषद व नगरपंचायत व ग्रामपंचायत यांच्या बाबतीत ज्यांचे जात प्रमाणपत्र अवैध ठरले आहे. त्यांच्या बाबतीत अनर्हतेचे आदेश जात प्रमाणपत्र अवैध ठरल्याचे कळविल्यापासून त्वरित व जास्तीत जास्त १५ दिवसाचे आत सदस्यत्व रद्द करुन संबंधितांना बजवावा कुठल्याही सदस्याचे जात प्रमाणपत्र रद्द झाल्यास ते तात्काळ जिल्हाधिकारी यांना कळविणे बंधनकारक आहे. त्यानुसार जात पडताळणी कार्यालयाने ते पडताळणी देणे शक्य नसल्याचे कळविले. सौ.बर्डे यांचे जात प्रमाणापत्रच रद्द झाल्याने जिल्हाधिकारी डॉ. राजेंद्र भोसले यांनी त्यांचे ग्रामपंचायत सदस्य पदच रद्द केले आहे.