सत्याचा पुरस्कार करतांना समानताही प्रत्येकाच्या जीवनात असेल तर महात्मा फुलेंना अपेक्षित समाज निर्माण व्हायला वेळ लागणार नाही – बाळासाहेब भुजबळ
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर – सत्याचा पुरस्कार करतांना समानताही प्रत्येकाच्या जीवनात असेल तर महात्मा फुलेंना अपेक्षित समाज निर्माण व्हायला वेळ लागणार नाही, असा विश्वास ओबीसी, व्ही.जे.एन.टी. जनमोर्चाचे शहर जिल्हाध्यक्ष बाळासाहेब भुजबळ यांनी व्यक्त केला. महात्मा फुले यांच्या पुण्यतिथीनिमित्त माळीवाडा येथील महात्मा फुले यांच्या पुतळ्याला पुष्पमाला अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. यावेळी श्री.भुजबळ बोलत होते. पुण्यतिथी उत्सव सभेच्या अध्यक्षस्थानी बारा बलुतेदार महासंघाचे जिल्हाध्यक्ष माऊली गायकवाड होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून रयत शिक्षण संस्थेचे नगर विभाग सल्लागार विष्णूपंत म्हस्के होते.
अध्यक्षीय भाषणात माऊली गायकवाड म्हणाले, तत्कालीन समाजात विषामता होती, त्याला छेद देत प्रवाहाच्या विरोधात जावून समाजात समानता निर्माण करण्याचा प्रयत्न आद्य समाज सुधारक महात्मा फुले यांनी केला. तर उपेक्षितांना शिक्षण, शेतकर्यांचे प्रश्न आणि पारतंत्र्यात लोकाभिमुख स्वराज्याचे महत्व फुले दाम्पत्यांनी तत्कालीन समाजाला पटवून दिले, असे संत नामदेव देवस्थानचे अध्यक्ष श्रीकांत मांढरे यांनी सांगितले.
उपेक्षितांना न्याय मिळवून देण्याचे कार्य बारा बलुतेदार महासंघ व ओबीसी जनमोर्चा करत आहे तो शाहू-फुले-आंबेडकर चळवळीचाच एक भाग आहे, असा दावा जय भगवान महासंघाचे जिल्हाध्यक्ष रमेश सानप यांनी केला. या चळवळीला समाजाने प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन महासंघाचे जिल्हा उपाध्यक्ष अनिल इवळे यांनी केले.
प्रारंभी महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा अनुरिता झगडे यांनी स्वागत व प्रास्तविक केले. युवा जिल्हाध्यक्ष आर्यन गिरमे यांनी महात्मा फुले यांचा जीवनपट घटनाक्रमानुसार वाचून दाखविला. युवा उपाध्यक्ष नितीन पवार, जनमोर्चाचे सरचिटणीस शशिकांत पवार, उपाध्यक्ष संजय सागांवकर, उद्योजक राजेंद्र पडोळे आदि उपस्थित होते. शेवटी राजेश सटाणकर यांनी आभार मानले.