बनावट जातवैधता प्रमाणपत्र सादर केल्याप्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर : जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बनावट कागदपत्रांचा वापर केल्याप्रकरणी कोपरगाव तालुक्यातील एका व्यक्तीविरुद्ध तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अहिल्यानगर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीकडे आनंद गंगाराम देवरे यांनी त्यांच्या मुलाच्या जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज केला होता. यासाठी त्यांनी आपल्या दुसऱ्या मुलाचे जातवैधता प्रमाणपत्र पुरावा म्हणून सादर केले. मात्र, समितीने पडताळणी केली असता, संबंधित वैधता प्रमाणपत्र हे खोटे व बनावट असल्याचे आढळून आले.
याबाबत अधिक तपास करताना समितीच्या दक्षता पथकाने अर्जदाराच्या भावाचे जातवैधता प्रमाणपत्र आधीच अपूर्ण कागदपत्रांमुळे नस्तीबंद झाल्याचे निष्पन्न केले. तरीही अर्जदाराच्या वडिलांनी ते प्रमाणपत्र सादर करून समितीची दिशाभूल केल्याचे स्पष्ट झाले.
समितीने अर्जदार व त्यांच्या वडिलांना सुनावणीसाठी बोलावले असता, त्यांनी बनावट प्रमाणपत्र कोठून व कसे मिळाले याबाबत समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. तसेच, अर्जदाराने सादर केलेले पुरावे खोटे असल्यास जबाबदारी त्यांची असेल, याची त्यांनी शपथपूर्वक कबुली दिली होती.
या प्रकरणी आनंद गंगाराम देवरे (रा. कोपरगाव, मूळ रा. जिल्हा धुळे) यांच्याविरोधात तोफखाना पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जातवैधता प्रमाणपत्र मिळविण्यासाठी बोगस, बनावट किंवा खोटे कागदपत्र सादर करण्यात येऊ नये,असे आवाहन जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीच्यावतीने करण्यात आले आहे.