बदलापूर घटनेच्या निषेधार्थ बंद, निषेध : मोर्चात सहभागी होण्याचे महाविकास आघाडीचे आवाहन
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
नगर : राज्यातील महिलांवरील लैंगिक अत्याचाराच्या वाढत्या घटनांविरोधात तसेच बदलापूर येथील लैंगिक शोषणाच्या घटनेच्या निषेधार्थ महाविकास आघाडीने शनिवारी (दि.२४) नगर बंदची हाक दिली आहे. हा बंद सकाळपासून दुपारी २ वाजेपर्यंत होईल. त्यात तसेच सकाळी११ वाजता काढण्यात येणाऱ्या निषेध मोर्चात सर्वांनी आपसातील मतभेद विसरुन सहभागी व्हावे, असे आवाहन नगरमधील महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
महाविकास आघाडीच्या वतीने शनिवारी महाराष्ट्र बंद ची हाक दिलेली आहे. या पार्श्वभूमीवर नगरमध्ये महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी शुक्रवारी (दि.२३) दुपारी पत्रकार घेत भूमिका स्पष्ट केली. राज्यात महिला, मुली सुरक्षित राहिल्या नाहीत, बदलापूरच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्र ढवळून निघालेला आहे. हायकोर्टानेही या प्रश्नी राज्य सरकारला झापले आहे. मात्र अतिशय असंवेदनशील असलेल्या या सरकारला जाग आणण्यासाठी हा बंद पुकारलेला आहे. सध्या सणासुदीचे दिवस असल्याने व्यापारी वर्गाची गैरसोय होऊ नये म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी हा बंद दिवसभर ठेवण्याऐवजी दुपारी २ वाजेपर्यंत ठेवण्याचे आवाहन केलेले आहे. नगर मधील सर्व व्यापारी, व्यावसायिकांनी यामध्ये सहभागी व्हावे असे आवाहन महाविकास आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी यावेळी केले.
सकाळी ११ वाजता जुन्या बसस्थानकाजवळील छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकासमोर महाआघाडीचे सर्व पदाधिकारी, स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, महिला, विद्यार्थिनी नागरिक जमा होवून बदलापूर घटनेचा निषेध नोंदवणार आहेत. त्यानंतर काळ्या फिती लावून निषेध मोर्चा काढण्यात येणार असून मोर्चाने जावून जिल्हाधिकारी व पोलिस अधीक्षकांना निवेदन देण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.
यावेळी शिवसेना ठाकरे गटाचे शहर प्रमुख संभाजी कदम, राष्ट्रवादी शरद पवार गटाचे शहर जिल्हाध्यक्ष अभिषेक कळमकर, युवा सेनेचे विक्रम राठोड, यांच्या सह अन्य पदाधिकारी संजय शेंडगे, गणेश कवडे, योगीराज गाडे, शाम नळकांडे, सचिन शिंदे, संतोष गेनाप्पा, प्रशांत भाले, मुन्ना भिंगारदिवे, जेम्स अल्हाट, गौरव ढोणे, संदीप दातरंगे, सुमित धेंड आदी यावेळी उपस्थित होते.