प्रेमात अडथळा झाल्याने सोनु चौधरी याची हत्या ; अखेर अ.नगर एलसीबी टिम’ला तपासात यश

संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर :
श्रीरामपूर तालुक्यातील खंडाळा गावाच्या शिवारातील यशवंतबाबा चौकाजवळ झालेल्या खूनाची ६ महिन्यानंतर तपास लावण्यात अहमदनगर एलसीबी टिम’ला यश आले आहे. प्रेमात अडथळा झाल्याने सोनु चौधरी याची भुपेंद्र व त्याचा साथीदार सुरज रावत यांनी हत्या केल्याचे उघड झाले आहे. परराज्यातील दोघांना अटक करण्यात आले आहे. भुपेंद्र शिवप्रसाद रबि (वय 23, रा. सुनौरा, ता. अमरपाटण, जि. सतना, राज्य मध्यप्रदेश सध्या रा. संजय नगर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर), सुरज रामनाथ रावत (रा. सुनौरा, ता. अमरपाटण, जि. सतना, राज्य मध्यप्रदेश सध्या रा. संजयनगर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) असे पकडण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, श्रीरामपूर अपर पोलीस अधीक्षक श्रीमती. स्वाती भोर मॅडम, शिर्डी व अतिरिक्त प्र.श्रीरामपूरचे डिवायएसपी संदीप मिटके यांच्या मार्गदर्शनाखाली एलसीबीचे पोनि दिनेश आहेर यांनी दिलेल्या सुचनेनुसार एलसीबीचे पोसई तुषार धाकराव, सोपान गोरे, पोहेकॉ मनोहर गोसावी, दत्तात्रय गव्हाणे, देवेंद्र शेलार, पोना रविंद्र कर्डीले, संतोष लोढे, गणेश भिंगारदे, संतोष खैरे, फुरकान शेख, पोकॉ सागर ससाणे, किशोर शिरसाठ, प्रशांत राठोड, मेघराज कोल्हे व चापोहेकॉ संभाजी कोतकर आदिंच्या टिम’ने ही कामगिरी केली आहे.

याबाबत समजलेली माहिती अशी की, दि.१८ जानेवारी २०२३ रोजी श्रीरामपूर ते वाकडी रोडवरील खंडाळा गावचे शिवार (ता. श्रीरामपूर) येथील यशवंतबाबा चौकाजवळ कोणीतरी अज्ञाताने अनोळखी पुरुषाचे डोक्यात काहीतरी वस्तुने मारहाण करुन, चेहरा विद्रुप करुन खून केला व रोडचे बाजूला असलेल्या खड्डयात टाकून पुरावा नष्ट केला. या घटनेबाबत श्रीरामपूर शहर पोलिस ठाण्याचे पोना मच्छिंद्र शेलार यांनी दिलेल्या तक्रारीवरुन श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात गु.र.नं. ५७/२०२३ भादविक ३०२,२०१ प्रमाणे अनोळखी इसमाविरुध्द खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. गुन्हा दाखल झाल्यानंतर घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन एसपी राकेश ओला यांनी एलसीबी पोनि दिनेश आहेर यांना ना उघड खुनाचे गुन्ह्याचा समांतर तपास करुन गुन्हा उघडकिस आणण्याबाबत आदेश दिले होते.
गुन्ह्याचा पोनि श्री. आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली तांत्रिक विश्लेषणाव्दारे सखोल तपास करताना तपासात संशयीत मयत हा मध्यप्रदेश राज्यातील असल्याचे दिसून येत असल्याने खात्री करण्यासाठी एलसीबी टिम’ने तसेच श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्याचे पोनि हर्षवर्धन गवळी यांनी पोना बिराप्पा करमल यास मदतीस घेऊन मध्यप्रदेश येथे पुढील तपासकामी रवाना केले.
एलसीबी टिम’ने मध्यप्रदेश राज्यात जाऊन संशयीत मयताचा मोबाईल क्रमांकाचे पत्त्यावर जाऊन खात्री करताना पथकास माहिती प्राप्त झाली मोबाईल क्रमांक हा सोनु समरालाल चौधरी हा वापरत होता. परंतु सोनु चौधरी हा हरवले असल्याबाबत अमरपाटण पोलीस ठाण्यात मध्यप्रदेश येथे तक्रार नोंद केली असल्याची सोनु चौधरीच्या नातेवाईकांकडून माहिती मिळाली. सोनु चौधरी यांच्या नातेवाईकांनी गुन्ह्यातील मयताचे फोटो दाखविले असता त्यांनी मयत हा सोनु समरालाल चौधरी‌ (वय 25, रा. खरवाही, ता. अमरपाटण, जि. सतना, राज्य मध्यप्रदेश) हा असल्याचे त्याचे अंगातील कपडे व पायातील कडे पाहून ओळखले. सोनु चौधरी यांच्याबाबत नातेवाईकांकडे अधिक माहिती घेता मयत हा त्याचा मित्र भुपेंद्र शिवप्रसाद रबि (वय 23, रा. सुनौरा, ता. अमरपाटण, जि. सतना, राज्य मध्यप्रदेश सध्या रा. संजय नगर, श्रीरामपूर, जि. अहमदनगर) याच्याकडे जातो असे सांगून गेला असल्याची माहिती मिळाली. भुपेंद्र रबि याचा मोबाईल क्रमांक प्राप्त करुन त्याचा शोध घेताना तो श्रीरामपूर येथे असल्याचे तांत्रिक विश्लेषणावरुन दिसून आल्याने एलसीबी टिम’ने मयत सोनु चौधरी याचे हरल्याबाबतचे अमरपाटण पोलीस ठाणे येथून माहिती प्राप्त केली.
त्यानंतर पथकाने भुपेंद्र शिवप्रसाद रबि याचा तांत्रिक विश्लेषणाचे आधारे शोध घेतला. तो मिळून आल्याने त्यास ताब्यात घेतले. त्याच्याकडे गुन्ह्याच्या अनुषंगाने विचारपुस केली असता त्याने गुन्हा हा त्याचा साथीदार सुरज रामनाथ रावत याच्या मदतीने केल्याचे सांगितले. त्यानंतर सुरज रावत यास ताब्यात घेऊन दोघांकडे मयत सोनु चौधरी यास का मारले, याबाबत विचारपुस करता आरोपी भुपेंद्र याने सांगितले की, त्याचे गांवातील एका विवाहित महिलेशी प्रेमसंबंध होते. महिला ही तिच्या पतीसोबत वाद झाल्याने तिच्या राहत्या घरुन पळून भुपेंद्र याच्याकडे मध्यप्रदेश येथून श्रीरामपूर येथे आलेली होती. भुपेंद्र याने तिला लोणी येथे एक खोली घेऊन राहण्यासाठी दिलेली होती. तो देखील तिच्यासोबत राहत होता. त्यावेळेसे त्याला समजले की, महिलेचे मयत सोनु चौधरी याच्यासोबत देखील प्रेमसंबध आहेत. त्याबाबत त्याने महिलेस विचारणा करता तिने ती मयत सोनु चौधरी यांच्यासोबत लग्न करणार असल्याचे सांगितले‌. तू माझा फक्त मित्र बनून रहा असे म्हणाली. या गोष्टीचा भुपेंद्र याला राग आल्याने व त्याच्या प्रेमात मयत सोनु चौधरी अडथळा बनल्याने त्याने सोनु याला तुझे महिलेशी लग्न लावुन देतो, तू श्रीरामपूर या ठिकाणी ये असे म्हणून त्यास बोलावून घेतले. सोनु हा रेल्वेने मनमाड येथे आल्यावर भुपेंद्र व त्याचा साथीदार सुरज रावत अशांनी मनमाड येथे जाऊन महिला ही श्रीरामपूर येथे असल्याचे मयत सोनु यास सांगून त्याला दुचाकीवर बसवून श्रीरामपूर येथे एमआयडीसी परिसरात आणून दारु पाजली. सोनु चौधरी हा दारुच्या नशेत असताना त्याच्या डोक्यावर व तोंडावर लाकडी दांडक्याने मारुन त्यास जिवे ठार मारले. तसेच त्याची ओळख पटू नये, म्हणून त्याचा चेहरा विद्रुप केला असल्याची हकिगत सांगितली.
ताब्यातील दोघांनी गुन्हा केल्याचे निष्पन्न झाल्याने त्यांना श्रीरामपूर शहर पोलीस ठाण्यात हजर केले आहे. पुढील तपास श्रीरामपूर शहर पोलीस करीत आहे.

Related Articles

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Stay Connected

0FansLike
3,912FollowersFollow
22,100SubscribersSubscribe
- Advertisement -spot_img

Latest Articles

error: Content is protected !!