संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
पाथर्डी : तालुक्यातील शिरसाटवाडी येथील आयुषी नितीन खेडकर हिने जिल्ह्यातील पहिली महिला फायटर होण्याचा बहुमान पटकावला आहे. जाहीर झालेल्या यादीत देशभरातून ६१ जणांची वायुसेनेत निवड झाली असून, त्यामध्ये अकरा मुलींचा समावेश आहे. यामध्ये आयुषीने मराठीचा झेंडा अटकेपार फडकावला आहे.
आयुषी येथील डॉ. नितीन खेडकर व डॉ. मनीषा खेडकर यांची कन्या असून, सध्या ती नगरमधील पहिली महिला अधिकारी म्हणून कार्यरत आहे. फायटर पायलट बंगळुरू येथे एका कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून कार्यरत आहे. ऑगस्ट २०२० रोजी तिने फायटर पायलटची परीक्षा दिली होती.
आयुषी नितीन खेडकर हिचे चौथीपर्यंतचे शिक्षण पाथर्डी येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत झाले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण पुणे येथील ज्ञानप्रबोधिनीत झाले. इयत्ता नववीत असताना तिने गुगल सायन्स फेअर या जागतिक स्पर्धेत सहभाग घेतला. या स्पर्धेत तिची आशिया व ऑस्ट्रेलिया खंडातून निवड झाली आणि गुगल कंपनीने अमेरिकेहून मेडल पाठवत तिचा सन्मान केला. इयत्ता अकरावी व बारावीचे शिक्षण तिने पेस अकादमीत पूर्ण केले. त्यानंतर बीटेक चेन्नई येथून केले. याच काळात तायक्वांदो स्पर्धेत राष्ट्रीय खेळाडू म्हणून गुवाहटी येथील स्पर्धेत सहभाग नोंदवत कांस्य पदक पटकावले. बीटेकचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर ती जीआरईची परीक्षा उत्तीर्ण होऊन पुढील शिक्षणासाठी तिची अमेरिकेला निवड झाली. मात्र, देशसेवाच करायची हेच उद्देश असल्याने तिने अमेरिकेला जाण्याचे टाळत बंगळुरू येथील एबीबी या कंपनीत वरिष्ठ अधिकारी म्हणून रुजू झाली. नोकरी करत असतानाच तिने एसएसबीची परीक्षा दिली. या परीक्षेत ती उत्तीर्ण होऊन तिची एकाच वेळी नौदल आणि वायुसेनेत निवड झाली. मात्र, तिने वायुदलात फायटर पायलट म्हणून करीअर करण्याचा निर्णय घेतला. एक सप्टेंबर रोजी हैदराबादला ती प्रशिक्षणासाठी रवाना होणार आहे. प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर ती वायुदलात फायटर पायलट म्हणून रुजू होत देशसेवा करणार आहे.