संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव- पोलीस दूरक्षेत्रात पोलीस कर्मचा-यासामोरच पत्रकाराला मारहाण केल्याप्रकरणी एका व्यक्ती विरोधात पत्रकार सुरक्षा कायदा २०१९ चे कलम ३ व ४ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.हा प्रकार गुरुवारी (दि.१५)रात्री ९ वाजण्याच्या सुमारास बोधेगाव (ता.शेवगाव) येथील पोलीस दूरक्षेत्रात घडला. पत्रकार सुरक्षा कायदा अन्वये तालुक्यात प्रथमच असा गुन्हा दाखल झाला आहे. दीपक भीमराव तागडे (रा.बोधेगाव) यांच्याविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पत्रकार बाळासाहेब अंबादास खेडकर यांनी फिर्याद दिली आहे.
श्री.खेडकर हे रात्री नऊ वाजण्याच्या सुमारास बोधेगाव पोलीस दूरक्षेत्रासमोरून जात असताना दूरक्षेत्राच्या आवारात लोकांची गर्दी दिसली म्हणून ही गर्दी कशाची आहे. हे पाहण्यासाठी तेथे गेले होते. त्यावेळी त्याठिकाणी एका खाजगी व्यक्तीचा वाढदिवस साजरा करण्याचा कार्यक्रम सुरु होता.तेथे पो.ना.संतोष धोत्रे हे ही उपस्थित होते. पत्रकार खेडकर यांना तेथे पाहताच दीपक भीमराव तागडे याने तू पत्रकार येथे कशाला आलास तू बाहेर हो असे म्हणत त्यांची गचांडी धरून तोंडात मारल्या व परत जर येथे थांबलास तर तुझे हातपाय तोडून जीवे मारून टाकू अशी धमकी दिली. पोलीस कर्मचारी संतोष धोत्रे यांच्यासमोर व पोलीस दूरक्षेत्रात हा गंभीर प्रकार घडला.तालुक्यातील पत्रकारांनी याबाबत पोलीस निरीक्षक विलास पुजारी यांची भेट घेऊन गुन्हा दाखल करण्यास भाग पाडले.पुढील तपास स.पो.नि.विश्वास पावरा करत आहेत.