निलेश ढाकणे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
शेवगाव : कोपरगाव येथील नाते शब्दांचे साहित्य मंचाने आयोजित केलेल्या काव्य स्पर्धेत बालमटाकळी ता शेवगाव येथील जिल्हा परिषद शाळेच्या शिक्षिका श्रीमती पूनम राऊत यांच्या काव्य रचनेस प्रथम क्रमांक मिळाला आहे. २०२२ मध्ये संपन्न झालेल्या या स्पर्धेचा ‘बळीराजा’ हा विषय होता.
या स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवणार् या साहित्यिकास ‘नाते शब्दाचे साहित्य तारा’ या पुरस्काराने गौरवण्यात येते. दि. २ एप्रिल रोजी या साहित्य मंचाच्या वतीने कोपरगाव येथे राज्य स्तरीय साहित्य संमेलन आयोजित केले होते.
या संमेलनात श्रीमती राऊत यांना मा. प्रा. चंद्रकांत दादा वानखेडे (जेष्ठ साहित्यिक पुणे) मा. प्रा. रजनीताई लुंगसे मॅडम संमेलनाध्यक्षा यांच्या हस्ते ‘साहित्य तारा’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. या वेळी श्री ज्ञानेश्वर शिंदे (अध्यक्ष नाते शब्दाचे साहित्य मंच) माजी आमदार स्नेहलता ताई कोल्हे, ऐश्वर्यालक्ष्मी सातभाई (नगराध्यक्षा कोपरगाव) आदी मान्यवर मंचावर उपस्थित होते.मंचावरील मान्यवरांनी राऊत यांच्या काव्य रचनेचे कौतुक करत पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.
श्रीमती राऊत या बोधेगाव च्या रहिवासी असून, महाविद्यालयीन जीवनापासून त्यांनी काव्य रचनेचा छंद जोपासला आहे. अलीकडेच त्यांच्या ‘पूनवेच शब्द चांदणं’ या काव्यसंग्रहाचे प्रकाशन झाले आहे. या काव्य संग्रहास काव्य रसिकांनी भरभरून दाद दिली आहे. राऊत यांना साहित्य क्षेत्रातील अनेक पुरस्कार मिळाले असून, राज्य भरातील अनेक साहित्य संमेलनात त्यांचा सक्रिय सहभाग असतो.
या पुरस्कारासाठी बोधेगाव पंचक्रोशीतून तसेच शिक्षण क्षेत्रातील साहित्यिका कडून त्यांचे अभिनंदन होत आहे.