आयुक्तांच्या आदेशालाही नगररचना विभागातील मलिदा गँगकडून केराची टोपली
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहिल्यानगर ः महानगरपालिकेच्या नगररचना विभागाच्या अधिकार्यांविरोधात माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी प्रभागातील नागरिकांसह सहायक संचालक नगर रचनाविभाग स्नेहल यादव यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले. यावेळी सचिन दारकुंडे ,हर्षल बांगर ,आयुष लहारे ,सचिन कसबे ,अभिषेक जाधव, संदीप चौधरी,आशुतोष लाहारे, अभिषेक वाघमारे ,देवेंद्र गोधडे, निशांत गोंधळी, प्रशांत लिपणे, शिवम म्याना आदी नागरिक उपस्थित होते.
नगर शहरात राज्य शासनाच्या माध्यमातून आ. संग्राम जगताप यांच्या प्रयत्नातून विविध विकास कामे सुरू आहेत, उपनगरांमध्ये रोडचे, गटारीचे अशा विविध विकास कामे सुरू असताना नगररचना विभागाने त्या त्या ठिकाणी जाऊन रस्त्याचे मोजमाप करून मार्किंग देण्याचे काम करणे गरजेचे असताना देखील नगररचना विभागाचे अधिकारी विकास कामांच्या ठिकाणी जाऊन भेटी देत नसल्याने विकास कामे ठप्प आहेत, मनपा आयुक्त यांच्या आदेशाला देखील नगर रचना विभाग केराची टोपली दाखवत आहे, अनेक ठिकाणी स्थानिक नागरिक आणि बांधकाम विभागातील कर्मचारी आणि ठेकेदार यांच्याशी वाद होतात, नागरिकांना आणि बांधकाम विभागातील कर्मचार्यांना महापालिकेच्या रस्त्याची हद्द माहीत नसल्याने ही हद्द नगररचना विभागच निश्चित करून देऊ शकते मात्र नगररचना विभागाचे अधिकारी या ठिकाणी जात नसल्याने अनेक वेळा नगरसेवक, नागरिक आणि ठेकेदार यांच्यामध्ये वादविवाद होतानाचे चित्र नगरमध्ये सर्रास पाहायला मिळते.
याच बरोबर नगर शहरात नागरिक जागा घेऊन आपले घर बांधण्याचे स्वप्न पाहत असताना घर बांधकामाचा पूर्णत्वाचा दाखला किंवा बांधकाम परवानगीचा दाखला देण्यासाठी नगर रचना विभाग नागरिकांना दाखला घेण्यासाठी चकरा मारायला लावतात अनेक नागरिक बँकेचे कर्ज काढून आपले घर बांधण्याचे स्वप्न पाहत असताना नगररचना विभाग परवाना देत नसल्याने नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागतो. याबाबत अनेक वेळा आयुक्तांनी सांगूनही नगररचना विभागातील अधिकारी काम करत नसल्याने अखेर माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी नगर रचना विभागाच्या अधिकारी स्नेहल यादव यांच्या दालनासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले
विशेष म्हणजे नगररचना अधिकारी स्नेहल यादव या गैरहजर होत्या. त्यांना वारंवार संपर्क करूनही त्यांनी मोबाईल उचलला नाही ही एक अधोरेखित करण्यासारखी गोष्ट आहे अधिकारी जर नगरसेवकांना दाद देत नसतील तर सर्वसामान्य नगररचना विभागात आल्यावर काय हाल होत असतील हे याच गोष्टीवरून लक्षात येते. नगर रचना विभाग हा मलिदा गँग ( पैशासाठी ) काम करत असून नागरिकांच्या हिताचे काम न करता अधिकारी फक्त स्वतःच्या हिताचे काम करण्यासाठी या ठिकाणी आलेले आहेत का ? असा सवाल करत अनेक विकास कामे या अधिकार्यांमुळे अडली आहेत. तसेच नागरिकांची घराचे बांधकाम परवानगी देत नसल्याने नागरिक या ठिकाणी रोज चकरा मारूनही त्यांचे काम होत नसल्याने अशा अधिकार्यांवर कडक कारवाई करावी अशी मागणी माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर यांनी केली आहे.