संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर- येत्या कोरोनाच्या तिस-या लाटीत काळात भाजपा स्वास्थ्य स्वयंसेवकांनी ग्रामीण भागातील नागरिकांमध्ये जनजागृती करावी. स्वतःला झोकून देऊन काम करावेत, असे प्रतिपादन भाजपा राष्ट्रीय स्वास्थ स्वयंसेवक अभियानाचे उत्तर महाराष्ट्र संयोजक डॉ. प्रशांत पाटील यांनी केले.
अहमदनगर येथे प्रेमराज सारडा महाविद्यालयात भाजपा राष्ट्रीय स्वास्थ्य स्वयंसेवक अभियानाची रविवारी (दि.15) आयोजित कार्यशाळेतील उपस्थित कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना ते बोलत होते. अध्यक्षस्थानी भाजपाचे शहर जिल्हाध्यक्ष तथा नगरसेवक भैय्या गंधे हे होते.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना श्री जगदांबा देवी मोहटा देवस्थान विश्वस्त तथा भाजपा वैद्यकीय आघाडी अभियान उत्तर महाराष्ट्र सहसंयोजक डॉ. ज्ञानेश्वर दराडे म्हणाले, ग्रामीण भागातील प्रत्येक युवक व महिला कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांना या भयावह संकटाच्या काळात आरोग्यसेवक म्हणून मदत करायची आहे. स्वयंस्फूर्तीने भाजपाच्या या अभियानाच्या माध्यमातून युवक व महिला कार्यकर्त्यांनी सर्वसामान्यांच्या मदतीला धावून जायचे आहे. या दृष्टिकोनातून तळागाळापर्यंत जनजागृती व्हावी हेच या अभियानाचे उद्दिष्ट असल्याचे यावेळी डॉ. दराडे यांनी सांगितले.
यावेळी सूत्रसंचालनात अभियानाचे नगर उत्तर वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉ. महेंद्र कोल्हे यांनी अभियानाची सविस्तर माहिती दिली. तर जिल्ह्यात आगामी काळात तालुकास्तरावर बैठकी घेऊन नियोजन करण्यात येणार असल्याचे त्यांनी म्हटले.
नगर दक्षिण वैद्यकीय आघाडीचे संयोजक डॉ. विक्रम भोसले यांनी आभार मानले.
कार्यशाळेस समर्थ बुथ अभियानाचे प्रा. भानुदास बेरड, नगरसेवक सुवेंद्र गांधी, सुनील रामदासी, तुषार पोटे, डॉ. विलास मढीकर, आयटी सेलचे भाऊसाहेब वाकचौरे, ॲड. विवेक नाईक यासह भाजपाचे जिल्ह्यातील पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.