नगरच्या सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्सचे दुकान फोडणाऱ्या टोळीतील दोघे जेरबंद ; नाशिक मधून दोघांना अटक
📥मोक्यामधील फरार आरोपींनी केली होती सराफा बाजारात चोरी : कोतवाली पोलिसांची दमदार कामगिरी
📥सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम असा ३,३४,९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत
📥हडपसर पोलीस स्टेशन पुणे शहर यांचे मोक्याचे गुन्ह्यात फरार आहे अटक आरोपी; त्याचेवर दाखल आहेत १२ गुन्हे
संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
Online Natwork
अहमदनगर : शहरातील मध्यभागी असलेल्या सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्स हे दुकान फोडून सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा सुमारे २४ लाखांचा आवाज लुटणाऱ्या टोळीतील २ आरोपींना कोतवाली पोलिसांनी जेरबंद केले आहे. कोतवाली पोलिसांची तीन पथके गुन्हा घडल्यापासून सलग आठ दिवस आरोपींच्या मागावर होती. टोळीतील दोन आरोपी रेल्वेने प्रवास करून पळून जाण्याच्या तयारीत असताना धावत्या ट्रेनमध्ये आरोपींचा शोध घेऊन कोतवाली पोलिसांनी आरोपींना नाशिक मधून अटक केली आहे.
अक्षयसिंग बिरूसिंग जुनी (वय २२, रा. वैदवाडी, गोसावी वस्ती, हडपसर), अनमोल चरणसिंग शिकलकर (वय २३, रा. नाशिक रोड, सिन्नर फाटा सिकलकर वस्ती) अशी अटक केलेल्या दोन आरोपींची नावे आहेत.
एसपी राकेश ओला, अपर पोलीस अधिक्षक प्रशांत खैरे, नगर शहर डिवायएसपी अनिल कातकाडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोनि चंद्रशेखर यादव यांच्या सूचनेनुसार सपोनि विश्वास भान्सी, पोसई प्रविण पाटील, पोसई गजेंद्र इंगळे, अंमलदार तनविर शेख, गणेश धोत्रे, पोना योगेश भिंगारदिवे, पोना सलिम शेख, शाहीद शेख, इस्राईल पठाण, ए. पी इनामदार, अमोल गाढे, संदिप थोरात, अभय कदम, सोमनाथ राउत, सुजय हिवाळे, अतुल काजळे, कैलास शिरसाठ, सतिश शिंदे तसेच दक्षिण मोबाईल सेलचे राहुल गुंडु आदिंच्या टिम’ने ही कारवाई केली.
याबाबत समजलेली माहिती अशी की, सराफा बाजारातील वर्मा ज्वेलर्स या सराफ दुकानाचे शटर उचकटून काही जणांनी रविवारी पहाटे (दि.१) सोन्याचे दागिने व रोख रक्कम असा २४ लाख ६८ हजार रुपयांचा ऐवज लुटून नेला होता. जाताना सेक्युरिटी कामगार आणि स्वच्छता कर्मचारी यांना चाकूचा धाक दाखवून दमदाटी केली होती. याप्रकरणी संतोष सिताराम सहदेव ऊर्फ वर्मा (वय ५७, रा. गुंजाळ हॉस्पिटल, माणिक नगर ता. जि.अहमदनगर) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कोतवाली पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याचे गांभीर्य ओळखून पोलीस अधीक्षक राकेश ओला यांनी आरोपींचा शोध घेऊन तात्काळ अटक करण्याचे आदेश कोतवाली पोलिसांना दिले होते. पोनि चंद्रशेखर यादव यांनी आरोपींच्या शोधासाठी तीन पथके तात्काळ वेगवेगळे ठिकाणी रवाना केली होती. सराफा बाजारातील दुकान फोडण्यापूर्वी आरोपींनी नाशिक मधून मारुती इको कार चोरली होती. चोरीच्या कारमधून नगरमध्ये येऊन सराफा बाजारातील दुकान फोडले. अहमदनगर, गंगापूर, वैजापूर या मार्गे चोरटे पळून गेल्याचे सीसीटीव्ही फुटेज मधून लक्षात आल्यानंतर कोतवाली पोलिसांनी त्या दिशेने तपास सुरू केला. येवल्या नजीक रस्त्याच्या कडेला मारुती इको कार (MH १५ GR १२०३) कोतवाली पोलिसांना आढळून आली. तो परिसर कोतवाली पोलिसांनी पिंजून काढला. दरम्यान, कोतवाली पोलिसांना खाबऱ्यामार्फत माहिती मिळाली की गुन्हा केलेले दोन आरोपी मुंबई कडे पळून जात आहेत. या माहितीच्या आधारे पोलिसांनी आरोपीच्या वर्णनावरून ट्रेन ची माहिती काढून दोघांना नाशिक येथून ताब्यात घेतले. कसून चौकशी केली असता दोन्ही आरोपींनी इतर सहा साथीदारांच्या मदतीने गुन्हा केल्याची कबुली दिली आहे. अटक आरोपींकडून ४२.७९० ग्रॅम चोरी गेलेले सोन्याचे दागिने आणि सोने विक्रीचे ९१ हजार रू रोख रक्कम असा ३ लाख ३४ हजार ९०० रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे. पोनि चंद्रशेखर यादव यांच्या मार्गदर्शनाखाली सपोनी विश्वास भान्सी पुढील तपास करीत आहेत.