संग्राम सत्तेचा वृत्तसेवा
ऑनलाईन नेटवर्क
अहमदनगर ः विद्यार्थ्यांनी आपल्या आवडीच्या क्षेत्रात करिअर करण्याचे ध्येय निश्चित करून वाटचाल केली पाहिजे, असे प्रतिपादन नगर तालुका पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक राजेंद्र सानप यांनी केले.
हनुमान विद्यालय टाकळी खातगाव (ता. नगर) येथे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना प्रमुख पाहुणे म्हणून सानप बोलत होते. प्राचार्य बाळकृष्ण शेळके कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. नगर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक संतोष कुलट, जखणगावचे माजी सरपंच बी. आर. कर्डिले, पर्यवेक्षक सुहास नरवडे आदी उपस्थित होते.
सानप म्हणाले की, विद्यार्थ्यांनी आपले आवडीचे क्षेत्र करिअर म्हणून निवडले पाहिजे. आपले ध्येय निश्चित करून ते साध्य करण्यासाठी कठोर परिश्रमांची जोड दिली पाहिजे. गरिबी ही शिक्षणाच्या आड कधी येत नाही. केंद्र आणि राज्य शासनाच्या विविध शिष्यवृत्त्या विद्यार्थ्यांसाठी उपलब्ध आहेत. त्याच बरोबर स्वयंसेवी संस्था आणि दानशूर व्यक्ती हेसुद्धा मदतीसाठी येतात, त्यासाठी आपल्याला आपली गुणवत्ता सिद्ध करणे आवश्यक असते. अभ्यासासाठी दररोजचे नियोजन करून अभ्यास केल्यास कोणताही विषय अवघड जात नाही. काही व्यक्ती तरुणांच्या माध्यमातून भावना भडकवणारी संदेश सोशल मीडियाच्या माध्यमातून प्रसारित करतात. सोशल मीडियाचा वापर करताना कोणाच्या भावना दुखावतील किंवा आक्षेपार्ह संदेश पसरविले जाऊ नये, यासाठी प्रत्येकाने दक्ष राहिले पाहिजे. कोणत्याही गुन्ह्यांमध्ये सहभाग नको, या गोष्टी कटाक्षाने पाळण्याचे आवाहन ही त्यांनी केले. विद्यार्थ्यांनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे दिली. केशव चेमटे यांनी यांनी आभार मानले.